
प्रियदर्शिनी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध
प्रियदर्शिनी पतसंस्थेची
निवडणूक बिनविरोध
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १९ : येथील प्रियदर्शिनी नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या या पतसंस्थेच्या यापूर्वीच्या दोन निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीची परंपरा यावेळीही कायम राहिली आहे. सहायक निबंधक अमित गराडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
प्रियदर्शिनी पतसंस्थेच्या नेसरी, गारगोटी व कोल्हापूर येथे शाखा आहेत. संस्थेचे जिल्हा कार्यक्षेत्र आहे. पतसंस्थेच्या ११ जागांसाठी १७ अर्ज दाखल झाले होते. मात्र, यातील दोन उमेदवारांचे तीन अर्ज छाननीत अवैध ठरले. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी तिघांनी माघार घेतली. त्यामुळे ११ जागांसाठी तितकेच अर्ज शिल्लक राहिले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली.
बिनविरोध निवड झालेले असे- अरुण शहा, विश्वनाथ पाटील, सुरेश संकेश्वरी, बाळासाहेब पाटील, डॉ. विनय माने, आदित्य गाडवी (सर्वसाधारण गट), निळकंठ हिरेमठ (अनुसूचित जाती-जमाती गट), डॉ. सदानंद पाटणे (इतर मागास गट), शिवाजी गवळी (भटक्या जाती- विमुक्त जमाती), डॉ. सीमा पाटणे व अंजली संकेश्वरी (महिला राखीव गट). यातील डॉ. माने, श्री. गाडवी, बाळासाहेब पाटील व श्री. हिरेमठ हे नवीन चेहरे आहेत. उर्वरित सात विद्यमान संचालकांनाच पुन्हा संधी मिळाली आहे.