
महावितरण वृत्त
जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार शेतीपंप
वीज ग्राहकांकडे ९६२ कोटी थकबाकी
कोल्हापूर, ता. १८ ः महावितरण पुणे प्रादेशिक विभागातील १२ लाख ५४ हजार शेतीपंप वीज ग्राहकांची वीज बिलांची थकबाकी १२ हजार ६१ कोटी रुपयांवर पोहचली आहे. शेती पंप वीज ग्राहकांनी त्वरित वीज बिले भरावी लागणार आहेत. नविन शेतीपंप धोरण २०२० तयार केले असून, ३१ मार्च २०२३ पर्यंत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना थकबाकीवर ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच विलंब आकार व व्याज पूर्णतः माफ होणार आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.
महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागात पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. अधिक थकबाकीदार कृषिपंप ग्राहक सोलापूर मंडळात असून याची संख्या तीन लाख ६८ हजार असून थकीत व चालू बिलाची एकूण थकबाकी ५ हजार ३३८ कोटी रुपये आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार शेतीपंप वीज ग्राहकांकडे एकूण थकबाकी १ हजार ९६२ कोटी रुपये आहे.
चौकट
श्रीमंत शेतकऱ्यांकडून वीजबिल भरण्यास टाळाटाळ
राज्यात कृषिपंपासाठी सगळ्यात जास्त वीजेचा वापर पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात होत असून, लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविणारे श्रीमंत शेतकरी या भागात आहेत. महागडी चारचाकी वाहन वापरणारे, बंगल्यात राहणारे व नियमित आयकर भरणारे शेतकरी मात्र वीजबिल भरण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे आढळून आले आहे. असेही महावितरण कंपनीने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.