पोलिस वृत्त एकत्रित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त एकत्रित
पोलिस वृत्त एकत्रित

पोलिस वृत्त एकत्रित

sakal_logo
By

राजेंद्रनगरात रात्रीचे कोम्बिंग ऑपरेशन
एकास अटक; आर्मॲक्टनुसार गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ः राजेंद्रनगर झोपडपट्टीत राजारामपुरी पोलिसांनी फौजफाट्यासह कोम्बिंग ऑपरेशन राबवले. रात्री बारा वाजता सुरू केलेले हे ऑपरेशन पहाटे साडेपाच वाजता संपले. यामध्ये सूरज गणेश पाटील (वय २९, रा. सर्वपल्ली राधाकृष्ण शाळेजवळ, राजेंद्रनगर) याच्याकडे तलवार आढळली असून, त्याच्यावर आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, गुन्हेगारीला वेळीच रोखण्यासाठी पोलिस ठाणेनिहाय रात्रीत कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. राजेंद्रनगर झोपडपट्टीमध्ये काल अचानक पोलिसांचा ताफा पाहून अनेकजण आश्‍चर्यचकित झाले. पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन उपनिरीक्षक आणि १० अंमलदारांसह रात्री १२ वाजता कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात झाली. यावेळी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घराची झडती घेतली. अजामीनपात्र गुन्हेगारांचाही शोध घेतला. या शोध मोहिमेदरम्यान सूरज पाटील याच्याकडे तलवार आढळली. यामुळे त्याला अटक करण्यात आली. तसेच रेकॉर्डवरील अन्य ११ गुन्हेगारांचीही तपासणी केली. कोम्बिंग ऑपरेशन करून हाती फार काही लागले नसले तरीही पोलिसांचा पहारा चर्चेचा विषय ठरला.
-
बावड्यातील मारहाणीत तरुण जखमी
कोल्हापूर ः कसबा बावडा येथील नदी घाटावर झालेल्‍या मारहाणीत तरुण जखमी झाला. वेदांत शिवराज पोवार (वय २१, रा. बिंदू चौक) असे जखमीचे नाव आहे. काल रात्री साडेबाराच्‍या सुमारास ही घटना घडली. जखमीवर सीपीआर रुग्‍णालयात उपचार करण्‍यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
-
कुत्र्याला चुकविताना दुचाकीस्वाराचा अपघात
कोल्हापूर ः सांगली फाट्यानजीक रस्त्यावर आडव्या आलेल्या कुत्र्याला चुकविताना दुचाकीस्वाराचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार नितीन वसंत पाटील (वय ३८, रा. सम्राटनगर) जखमी झाले. काल रात्री साडेनऊच्‍या सुमारास हा अपघात घडला.
नितीन हे दुचाकीवरून जात असतानाच कुत्रा आडवा आला. त्याला चुकविण्‍याच्‍या प्रयत्‍नात दुचाकी घसरली. यामुळे नितीन जखमी झाल्याची माहिती सीपीआर पोलिस चौकीत नोंद झाली.