पाचगाव रस्त्यावर तरुणाचा निर्घृण खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाचगाव रस्त्यावर
तरुणाचा निर्घृण खून
पाचगाव रस्त्यावर तरुणाचा निर्घृण खून

पाचगाव रस्त्यावर तरुणाचा निर्घृण खून

sakal_logo
By

फोटो
७६६५२- मृत
76652 - ऋषीकेश सूर्यवंशी

०४१९३
4193
कोल्हापूर ः पाचगाव रस्त्यावरील जगतापनगरामध्ये खुनाचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. घटनास्थळी पोलिस निरीक्षकांकडून माहिती घेताना अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई.
०४१९१ -
4191
दुसऱ्या छायाचित्रात घटनास्थळी आलेले ऋषीकेशचे आई आणि वडील.

०४१९२
4192
तिसऱ्या छायाचित्रात घटनास्थळी झालेली गर्दी.


पाचगाव रस्त्यावर
तरुणाचा निर्घृण खून
चाकूचे वार, दगडाने डोके ठेचले

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर-कंदलगाव, ता. १९ ः पाचगाव रस्त्यावरील जगतापनगरच्या माळावर खून झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. ऋषीकेश महादेव सूर्यवंशी (वय २४, रा. गणेशनगर, चंबुखडी, शिंगणापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत करवीर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. याबाबतची फिर्याद माधवी महादेव सूर्यवंशी (रा. गणेशनगर, चंबुखडी, शिंगणापूर) यांनी दिली. त्यात दोघांचा संशयित म्हणून उल्लेख आहे. दरम्यान, पोलिसांनी तीन संशयितांची चौकशी सुरू केली आहे. आर्थिक वादातून खून झाल्याची माहिती पुढे येत आहे; पण नेमक्या कारणांचा शोध घेत असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक संजय गोर्ले यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः जगतापनगरात जोतिर्लिंग शाळेजवळील टर्फ मैदानाशेजारील माळावर सकाळी मुले खेळत होती. चेंडू आणण्यासाठी ते नाल्याकडेला गेले असता तेथे तरुणाचा मृतदेह दिसला. डोक्यात दगड घालून चाकूने वार केल्याचे दिसल्याने मुले भयभीत झाली. करवीरच्या महिला दक्षता समिती सदस्य छाया सांगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. साडेआठच्या सुमारास पोलिस घटनास्थळी पोचले. अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपअधीक्षक संकेत गोसावी यांनीही भेट दिली. करवीरचे निरीक्षक अजय सिंदकर आणि संजय गोर्ले यांच्या पुढाकारातून पंचनामा झाला. त्यावेळी बघ्यांची झालेली गर्दी पोलिसांनी पांगवली.
आधार कार्ड, मतदान ओळखपत्रावरून तो ऋषीकेश महादेव सूर्यवंशी (वय २५) असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना फुलेवाडीतील पत्ता त्याच्या मामाचा असल्याचे दिसून आले. मामा आणि आई-वडिलांना घटनास्थळी बोलविले. त्यांनी मृतदेह ओळखला. ऋषीकेश व्हिनस कॉर्नर येथील व्हिडिओ पार्लरमध्ये नोकरी करीत होता. त्याची आई माधवी म्हणाल्या, ‘फुलेवाडीत दोन डिसेंबरला मारामारी झाली होती. त्याचा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल आहे. त्याबाबत जामीन घेण्यासाठी ऋषीकेश आणि आम्ही काल न्यायालयात होतो. सायंकाळी साडेसहाला तो चहा घेऊन घरातून निघून गेला. रात्री दहापर्यंत घरी येतो. त्याला काल तीन वेळा कॉल केला, मात्र त्याने रिप्लाय दिला नाही. त्यानंतर आज सकाळी पोलिसांचा दूरध्वनी आला.’
ऋषीकेशच्या मित्राने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री दहाच्या सुमारास तो फुलेवाडी येथील एका हॉटेलजवळ मित्रासोबत होता. दोघांनी हस्तांदोलन सुद्धा केले होते. पोलिस यादिशेनेही तपास करीत आहेत. घटनास्थळाशेजारीच नाला आहे. त्या पलीकडे कळंबा मध्यवर्ती कारागृहाची शेती आहे. नाल्याशेजारी कैद्यांची विहीर आहे. तेथून पंधरा-वीस फुटांवर मृतदेह आढळला.
घटनास्थळी गांजासाठी वापरण्यात येणारा कोन, दारूच्या बाटल्याही आढळल्या आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा, दारूच्या पार्ट्या होतात. याबाबत अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी करवीर पोलिस ठाण्यात तक्रारीही केल्याची माहिती घटनास्थळावरील नागरिकांनी दिली; मात्र, त्याबाबत ठोस कारवाई झालेली नाही.

चौकट
झटापटीचा अंदाज
ऋषीकेशवर तीन-चार छोटे-मोठे चाकूचे वार आहेत. मृतदेहाशेजारीच रक्ताने माखलेला दगड होता. शर्ट काढलेला आणि बनियन फाटलेले होते. पायात बूट होता. आजूबाजूच्या झाडांनाही रक्त लागलेले होते. झटापटीनंतर खून झाल्याचा अंदाज उपअधीक्षक गोसावी यांनी व्यक्त केला.

घटनास्थळी तीन ते चार जण शक्य
ऋषीकेशकडे दुचाकी आहे. घटनास्थळी ती मिळाली नाही. त्यामुळे त्याला घटनास्थळी कोणी सोडून गेले आहे काय, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. पोलिसांनी सांगितले, की घटनास्थळी तीन रिकामे ग्लास आढळले आहेत. त्यामुळे घटनास्थळी तीन किंवा अधिक लोक असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.