
सिंदीया कार्यक्र
76917
महिलांमध्ये देशाचे भविष्य बदलण्याची ताकद
ज्योतिरादित्य शिंदे; मैत्रीण फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण
कोल्हापूर, ता. २० ः ‘‘भारताला महासत्ता बनवून जगात सन्मान मिळवून देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी देशाची जबाबदारी महिलांवर सोपवण्याची वेळ आली आहे. या महिलांच्या हातातच देशातील चित्र तसेच भविष्यही बदलण्याची ताकद आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय विमानवाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले.
गजानन महाराज नगर परिसरातील नागरिकांसाठी मैत्रीण फाउंडेशनच्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण केंद्रीय मंत्री शिंदे यांच्या हस्ते आज झाले.
मंत्री शिंदे म्हणाले, ‘गेल्या ६७ वर्षांत भारत जागतिक क्रमवारीत अकराव्या क्रमांकावर होता. मात्र, आठ वर्षांत पंतप्रधानांचे कष्ट व जनतेची साथ या जोरावर भारताने क्रमवारीत इंग्लंडला मागे टाकून पाचव्या क्रमांकावर पोहोचण्याचे काम केले आहे. हिंदवी स्वराज्याची निर्मिती करून त्याचा झेंडा सर्वदूर फडकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचे नौदल उभे केले. त्याचबरोबर किल्ल्यांची अक्षरशः माळ गुंफली. छत्रपतींचा तोच विचार घेऊन भारताला जगाच्या पाठीवर महासत्ता बनवण्यासाठी पंतप्रधान प्रयत्न करत आहेत. त्यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक आहेच; पण त्यात महिला शक्तीची साथ गरजेची आहे.’
यावेळी अरूंधती महाडिक, माधुरी नकाते यांनी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार अमल महाडिक, भाजपचे जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, आमदार गोपीचंद पडळकर, किरण नकाते, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, महेश जाधव, सुनील कदम, भूषण पाटील, अमर नकाते, विजय खाडे-पाटील उपस्थित होते. हेमंत आराध्ये यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
महिलांमध्ये जाऊन भाषण
मंत्री शिंदे यांनी भाषणावेळी व्यासपीठावरून बोलण्यापेक्षा माईक घेऊन समोर बसलेल्या महिलांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. टाळी वाजवायलाही संकोच करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन दिले. तसेच माधुरी नकाते यांना भाषण करण्यास सांगितले. तसेच त्यांनी कार्यक्रमस्थळी येताना व जाताना वयोवृद्ध महिलांना वाकून नमस्कार करून विचारपूस केली.