दूध परिषद उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दूध परिषद उद्‌घाटन
दूध परिषद उद्‌घाटन

दूध परिषद उद्‌घाटन

sakal_logo
By

फोटो
.....
77029


‘ऑपरेशन शाश्वत - स्थिरता’ राबवावे

आमदार सतेज पाटीलः दूध परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी आवाहन

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २० : ‘भविष्यात दुग्ध व्यवसाय कसा करावा, हा व्यवसाय कसा वाढवावा, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, तसेच याचा दूध उत्पादकांना कसा फायदा होईल, या सर्व माहितीचे संकलन केले पाहिजे. याच माहितीच्या आधारे तरुणांना रोजगार आणि दुग्ध व्यवसाय वाढीसाठी मदत होणार आहे. दूध संकलन वाढविण्यासाठी चांगल्या जनावरांची पैदास केली पाहिजे. दुधासाठी राबवलेल्या ऑपरेशन फ्लडप्रमाणे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने आता ‘ऑपरेशन शाश्वत आणि स्थिरता’ ही राबवले पाहिजे, असे मत आमदार सतेज पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. सहकारी आणि खासगी दूध संघाच्या वतीने सयाजी हॉटेलमध्ये येथे आयोजित दूध परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके, डॉ. चेतन नरके, चितळे डेअरीचे सीईओ विश्र्वास चितळे उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, ‘‘कोरोनानंतर देशातच नव्हे तर जगात दूध संकट ओढवले आहे. देशात ११ टक्के दूध संकलन घटले असल्याची माहिती आहे. दूध परिषदेमधील तज्ज्ञ लोकांच्या मागर्दर्शनाचा उपयोग तरुणांना व्यवसाय आणि रोजगार देण्यासाठी होणार आहे. डॉ. चेतन नरके यांनी घेतलेला हा उपक्रम निश्‍चितपणे सहकारी आणि खासगी दूध संघासह उत्पादकांनाही मार्गदर्शक ठरणारा आहे. भविष्यात दुधाची मागणी वाढणार आहे. यातून चांगले उत्पन्नही मिळणार आहे. तरुणांनी हा व्यवसाय जोमाने करावा यासाठी त्यांना पाठबळ देण्याचे काम दूध परिषदेच्या माध्यमातून दिले जात आहे.
अरुण नरके म्हणाले, ‘‘दुग्ध व्यवसाय वाढला पाहिजे. त्याला चालना देण्यासाठी व नवनवीन तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी दूध परिषदेचे आयोजन केले आहे. याचा उत्पादकांना निश्‍चितपणे फायदा होणार आहे.’’
डॉ. चेतन नरके म्हणाले, ‘‘देशात दुसरी श्र्वेतक्रांती करावी लागणार आहे. हे करत असताना दूध संकलन ही चळवळ म्हणूनच काम करावे लागेल. दुग्ध व्यवसाय तरुणांना प्रतिष्ठा मिळवून देणारा आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे.’’
विश्र्वास चितळे म्हणाले, ‘‘राज्यातील दुग्ध व्यवसायासमोर अनेक आव्हाने आहेत. ही आव्हाने परतवून लावत हा व्यवसाय निरंतर यशस्वीपणे सुरू ठेवला पाहिजे.’’
या वेळी सहकार आणि पणन खात्याचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, प्रभात डेअरीचे सीईओ राजीव मित्रा, निरंजन कराडे, योगेश गोडबोले आदींनी मार्गदर्शन केले. या वेळी कात्रज दूध संघाच्या अध्यक्षा केसरबाई पवार उपस्थित होत्या.
.....

सखोल अभ्यास आवश्यक

‘ज्या ठिकाणी जनावरे नाहीत, अशा ठिकाणाहून एक लाख -दोन लाख लिटर दूध संकलन होत आहे. याची माहिती घेतली पाहिजे. तसेच, राज्यात व देशात एकूण पशुधन किती आहे आणि दूध उत्पादन किती आहे, यावर सखोल अभ्यास केला पाहिजे’, असे मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.