आंबा हंगाम लांबणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबा हंगाम लांबणीवर
आंबा हंगाम लांबणीवर

आंबा हंगाम लांबणीवर

sakal_logo
By

हापूस आंब्याला महिन्याची प्रतीक्षा
मुंबईतील बड्या व्यापाऱ्यांनी कोकणातील सत्तर टक्के बागा केल्या काबीज

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः यंदाच्या हापूस हंगामातील पहिल्या कोकणी हापूस पेटीचा शाहू मार्केट यार्डात नुकताच मुहूर्ताचा सौदा झाला. यात ५१ हजार रुपयांना पहिली पेटी खासदार धनंजय महाडिक यांनी विकत घेतली. त्यापाठोपाठ स्थानिक खवय्यांना कोकणी आंब्याची उत्‍सुकता वाढली; मात्र मुंबईतील बड्या व्यापाऱ्यांनी महिन्याभरात कोकणातील ७० टक्के बागा काबीज करीत आंब्याची नोंदणी केली. त्यानुसार पहिल्या काढणीचा माल बड्या शहरांकडे तसेच परदेशात पाठवला जाणार आहे. यातून कोल्हापुरात हापूस आंबा पूर्ण क्षमतेने येण्यास एक ते दीड महिन्याचा विलंब होण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्डातील बाजारपेठेत जवळपास १२० फळ विक्रेते आहेत. यांपैकी ४० बडे व्यापारी कोकणातून थेट आंबा मागवतात. यंदा थंडी, धुके व ढगाळ वातावरणाचा आंबा बागांना फटका बसत आहे. यात रत्नागिरी पूर्व भाग तसेच मालवण, सावंतवाडी, दोडामार्गातील भागात आंबा उत्पन्न घटेल, अशी हूल मागील महिन्यात मुंबई बाजारपेठेत उठली. त्यासोबत अनेक व्यापाऱ्यांनी तातडीने जो मिळतोय तो आंबा सुरवातीलाच पदरात पाडून घेण्यासाठी जादा भाव देऊन कोकणातील बागाच खरेदी केल्या. त्यामुळे १५ फेब्रुवारी ते मार्च या पूर्ण महिन्यातील पहिल्या आंबा काढणीतील ८० ते ९० टक्के माल मुंबई बाजारपेठेकडे जाईल. तोच माल मुंबईतून परदेशात, तर अन्य राज्यातील बड्या शहरात जाणार आहे. तेथे आंब्याला दुप्पट भाव मिळतो. यातून उरणारा माल कोल्हापूर जवळची बाजारपेठ असल्याने येथे येईल. त्यामुळे मार्च महिन्यात हापूस आंबा पूर्ण क्षमतेने कोल्हापुरात येण्याची शक्यता आहे.

चौकट
दाक्षिणात्य आंब्यासाठी चालबाजी
कोल्हापुरात कोकणी हापूस आंब्याबरोबरच दक्षिण भारतीय आंबा हा आहे. साहजिकच कर्नाटकच्या खानापूर, लोंढा, कारवार, धारवाड तसेच केरळ, चेन्नईचा आंबाही येतो. तोही हापूस आहे. त्याचे भाव कोकणी हापूस आंब्याच्या तुलनेत निम्मेच असतात; मात्र अशा मालातून आर्थिक लाभ फारसा होत नाही, असा समज करून हा आंबा उपलब्ध होत असूनही येथील अपवाद वगळता घाऊक व्यापारी फारशी खरेदी करीत नाहीत. एप्रिल-मे महिन्यात मोजकाच आंबा खरेदी करतात. यातून महागडा कोकणी हापूस आंबा ग्राहकांनी घ्यावा, असाच अप्रत्यक्ष प्रयत्न होतो.

कोट
‘‘कोकणी हापूसची मागणी अनेक ग्राहक आतापासूनच करीत आहेत. मार्केट यार्डात सध्या हापूस आंबा तुरळक प्रमाणात येत आहे. मार्च महिन्यात आवक वाढेल, अशी स्थिती आहे. भाव किंचित वाढतील; मात्र आंबा चांगल्या दर्जाचा असेल.’’
-यासीन बागवान, फळ विक्रेते.

दृष्टिक्षेपात हंगाम
*कोल्हापुरात हंगामात दिवसाला कोकणी आंब्यांची आवक- २०० ते १२०० पेट्या
*तीन महिन्यांत सरासरी उलाढाल- ८० ते ९० कोटी
*दाक्षिणात्य आंब्यांची आठवड्याला आवक ५० ते ३०० पेट्या
*पहिल्या महिन्यात कोकणी हापूस पेटीचा भाव- १२०० पासून सुरू
*आवक वाढल्याच्या काळात भाव खाली येतात- ६०० रुपये पेटीपर्यंत