
बर्की ग्राममंडळ कार्यालयाचे लोकार्पण
77057
....
बर्की ग्राममंडळ आदर्शवत ठरेल
संजयसिंह चव्हाण : कार्यालयाचे लोकार्पण, ‘सकाळ’चा पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० : ‘आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचे ग्रामदान मंडळ बर्की (ता. शाहूवाडी) हे ग्रामीण विकासात आपला वेगळा आदर्श निर्माण करेल’, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी व्यक्त केला. मंडळाच्या इमारतीचे लोकार्पण करताना ते बोलत होते.
या वेळी ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष आनंद पाटील, उपाध्यक्ष गंगाराम घुर्के, सचिव विकास कांबळे, प्रशांत पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘सकाळ’ने बर्की गावातील विकासकामांसाठी पाठपुरावा केला आहे. त्याला आज यश आले.
‘वर्षभरापूर्वी बर्कीच्या व्यथा ‘सकाळ’ने रिपोर्ताजच्या माध्यमातून मांडल्या. त्यानंतर जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या नकाशावर बर्की आले. प्रशासन म्हणून आम्ही या गावाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. बर्कीला भेट देऊन कोणत्या विकासकामांची गरज आहे, याची माहिती घेतली. तसेच प्रत्येक विभागाकडून बर्कीसाठी काही ना काही योजना देण्याचा निर्णय घेतला. केवळ निर्णयच घेतला नाहीतर त्याची अंमलबजावणी कशी होईल, यासाठी प्रयत्न केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
चव्हाण म्हणाले, ‘‘गेल्या वर्षभरात गावासाठी जल जीवन मिशन योजनेतून सुमारे ३५ लाखांची पाणी योजना, कार्यालय दुरुस्ती, शाळा दुरुस्ती, गटर्स, दलित वस्तीमध्ये स्ट्रीट लाईट व रस्ते देण्यात आले. तसेच ६० वैयकितीक शौचालये बांधण्यात आली आहेत. अजूनही तेवढीच शौचालये बांधण्यात येणार आहेत. गावानेही या विकासाच्या कामांना चांगली साथ दिली आहे. पुढेही राजकारण विरहित गाव विकासाचे नियोजन करावे. असाच एकोपा ठेवला तर गावाला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही.’’
अध्यक्ष आनंद पाटील म्हणाले, ‘‘गावाचे मागासलेपण ‘सकाळ’मुळे समाजासमोर आले. तर सीईओ चव्हाण यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे हे मागासलेपण दूर करण्याचा प्रयत्न झाला. सचिव विकास कांबळे यांनी गावाच्या ग्रामदान मंडळाचे कार्य व मागील वर्षभरात सुरू करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती दिली.’’
....
‘सकाळ’सह अधिकाऱ्यांचे अभिनंदन
बर्कीची कथा व व्यथा ‘सकाळ’च्या माध्यमातून समाजासमोर आली. याची जिल्ह्यासह राज्याने दखल घेतली. महसूल, ग्रामविकास मंत्र्यांनी बैठक घेत, गावासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले. याबाबत दोन-तीन बैठकाही झाल्या. मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी प्रत्यक्षात गावाला आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधांची माहिती घेवून त्या पुरवण्याचा निर्णय घेतला. ‘सकाळ’ने गेली वर्षभर यासाठी सतत पाठपुरावा केला. याबद्दल सर्व ग्रामस्थांनी ‘सकाळ’ व चव्हाण यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.