बनावट नोटा जप्त, चौघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट नोटा जप्त, चौघांना अटक
बनावट नोटा जप्त, चौघांना अटक

बनावट नोटा जप्त, चौघांना अटक

sakal_logo
By

फोटो - ७७१८१, बी ०२९९७, बी ०२९९६, बी ०२९९१, बी ०२९९२, बी ०२९९३
साडेचार लाखांच्या बनावट नोटा जप्त
चौघांची टोळी गजाआड; मरळी फाट्यावर कारवाई; संगणक, प्रिंटर, मोटार जप्त


सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, कळे ता. २१ ः बनावट नोटा तयार करून त्याची वाहतूक करणाऱ्या रेकॉर्डवरील चौघांच्या टोळीचा आज, शनिवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छडा लावून त्याना गजाआड केले. कोल्हापूर ते गगनबावडा रोडवरील मरळी फाटा (ता. पन्हाळा) येथे ही कारवाई केली. त्यांच्याकडून ४ लाख ४५ हजार ९०० रुपयांच्या ५०० ते १०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. बनावट नोटा करण्यासाठी वापरलेले संगणक, प्रिंटर व इतर साहित्य, नोटा वाहतुकीसाठी वापरलेली अलिशान मोटार आणि मोबाईल हॅण्डसेट असा सुमारे १२ लाख ६२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमालही जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी बोलताना दिली. संशयितांना कळे-खेरीवडे न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

अटक केलेल्या संशयितांची नावे ः चंद्रशेखर बाळासाहेब पाटील (वय ३४, रा. कसबा तारळे, ता. राधानगरी), अभिजित राजेंद्र पवार (४०, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर), दिग्विजय कृष्णात पाटील (२८, रा. जयभवानी तालीमसमोर, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) आणि बनावट नोटा तयार करणारा संदीप बाळू कांबळे (३८, आंबेडकर नगर, कळे, ता. पन्हाळा) यांचा समावेश आहे.

मरळी फाट्यावर एका मोटारीतून बनावट नोटा घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस अंमलदार विजय गुरखे यांनी सविस्तर माहिती मिळवली. त्यानंतर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि निरीक्षक गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली गगनबावडा ते कोल्हापूर असा मार्गावर सापळा रचला. पांढऱ्या रंगाची मोटार दिसताच संशयावरून पोलिसांनी ती थांबवली. त्यातील व्यक्तींची आणि मोटारीची झडती घेतली. तेव्हा त्‍यांच्याकडे ५०० आणि १०० रुपयांच्या बनावट नोटा असल्याचे आढळले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी बनावट नोटा कळेतील संदीप कांबळे यांच्याकडून आणल्याचे सांगितले. संदीपच्या घरात नोटा बनवण्यासाठी असलेला संगणक, प्रिंटर आणि इतर साहित्यही जप्त केले. उपनिरीक्षक शेषराज मोरे, वैभव पाटील, सचिन देसाई, अनिल पास्ते, हिंदूराव केसरे, रणजित पाटील, दीपक घोरपडे, सोमराज पाटील, रफिक आवळकर यांच्या पथकानेही कारवाई केली.

-----------
खऱ्या ३० हजारांत लाखाच्या बनावट नोटा
संदीप हा बनावट नोटा तयार करून देत असे. एक लाख रुपयांच्या बनावट नोटाच्या बदल्यात तो तीस हजार रुपयांच्या खऱ्या नोटा घेत होता, असेही पोलिसांनी सांगितले. तो खासगी फायनान्स कंपनीकडून लोकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम करत होता.

------------
- चंद्रशेखर अनेक वर्षांपासून कोल्हापुरात सहकुटुंब राहतो. तो जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. त्याचे गावी क्वचितच येणे-जाणे होते. कोल्हापुरातील एका वजनदार लोकप्रतिनिधीचा तो जवळचा कार्यकर्ता आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत तो एका पक्षातून उमेदवारी घेणार होता असेही समजते. अंगरक्षक, चारचाकी गाड्या, उंची राहणीमान यातून तो प्रभाव टाकत असतो.
- अभिजित पवार याच्यावर गांधीनगर पोलिस ठाण्यात २०१९ मध्ये बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे.
- संदीप कांबळे हा कळे-खेरीवडे ग्रामपंचायतीच्या सदस्याचे पती आहेत. त्याचा कळेतील बाजारवाडा परिसरात फोटो स्टुडिओ होता. तो बंद करून त्याने काही वर्षांपूर्वी पतसंस्था काढली. सध्या ती संस्था बंद पडली. त्याची संशयित अभिजित पवार याच्यासोबत कोल्हापुरात ओळख झाली. पवारने त्याला कर्ज उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे पवारशी त्याची जवळीक वाढली.

-------------
नोटाबंदीनंतर बनावट नोटाबाबत कारवाई

वर्षे ः गुन्हे दाखल - अटक आरोपी
२०१७ ः ०० - ००
२०१८ ः ०१ - ०३
२०१९ ः ०३ - ०८
२०२० ः ०२ - ०७
२०२१ ः ०२ - ०५
२०२२ ः ०४ - ०६
२०२३ (जानेवारीपर्यंत) ः ०१ - ०४
एकूण ः १३ - ३३