
मोफत रेबीजचे लसीकरण
मोफत रेबीजचे लसीकरण
प्रजासत्ताकदिनी आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मोफत रेबीज लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी (ता. २६) सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हे लसीकरण केले जाणार आहे. गॅप चॅरिटेबल ट्रस्ट (नरेवाडी), हरेकृष्णा डिस्ट्रीब्युटर्स (कोल्हापूर) व गुडमन केमिस्ट(मुंबई) यांच्या वतीने हे लसीकरण करण्यात येणार आहे. स्टार टॉवर, पाच बंगला, शाहूपुरी या ठिकाणी या लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे.
रेबीज (पिसाळणे) हा आजार विषाणूजन्य असा प्राणघातक आजार आहे. एकदा का हा आजार झाला तर नंतर कोणताही उपचार होत नाही. हा आजार कोल्हा, लांडगा, तरस, वटवाघूळ, मुंगूस, घूस या जंगली प्राण्यांसह गाय, म्हैस, शेळी, मेंढी, डुकरे, उंट, कुत्रा, मांजर या पाळीव प्राण्यांनाही होतो. देशात दरवर्षी या आजाराने २५ ते ३० हजार लोक मृत्युमुखी पडतात. साधारण ३ ते ६ महिन्यांच्या रस्त्यावरील पिलांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक दिसून येते. चावा घेतल्यानंतर लाळेमार्फत हे रोगजंतू शरीरात प्रवेश करतात व मेंदूमध्ये जाऊन आजार निर्माण करतात. पिसाळलेल्या कुत्र्याची लाळ उघड्या जखमेवर पडली तरी याचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे रेबीजचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सुधाकर पाटील यांनी केले आहे.
मोफत रेबीज लसीकरणासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. या फॉर्मच्या माहितीसाठी यासाठी ९६२३२३६४६४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.