
पाहणी
L77854
दुधाळी नाल्यातील सांडपाणी
‘पंचगंगे’त मिसळत असल्याचे उघड
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी
कोल्हापूर, ता. २३ ः दुधाळी नाल्यातील मैलामिश्रित सांडपाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळत असल्याचे आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मिसळणाऱ्या सांडपाण्याचे नमुने अधिकारी संजय मोरे, सचिन हरभट यांना तपासणीसाठी घेतले.
दोन महिन्यांपूर्वी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीने दुधाळी नाल्यातील ५० टक्के सांडपाण्यापैकी फक्त पंधरा टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. स्वच्छ केलेल्या पाण्यासह इतर मैलामिश्रित सांडपाणी आडमार्गाने थेट पंचगंगा नदीमध्ये जात असल्याचे सांगितले होते. जलअभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता एन. एस. पाटील यांच्यासमवेत वस्तुस्थिती दाखवल्यानंतर दहा दिवसांत पाणी शुद्ध करून नदीत सोडले जाईल असे सांगितले. पण, कृती केली नाही. समितीने आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर बैठकीस बोलवले. त्यावेळी १०२ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडले जाते असल्याचे पत्र दिले. त्यामुळे समितीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन पाहणी करावी असे सांगितले. त्याप्रमाणे आज मोरे, हरभट यांनी पाहणी करून सांडपाणी नदीत मिसळत असल्याचे जाहीर केले. तसेच नदीत मिसळणाऱ्या मैलामिश्रित सांडपाण्याचे नमुने घेतले. या वेळी उपअभियंता आर. के. पाटील, समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, राजाभाऊ मालेकर, महादेव पाटील, लहुजी शिंदे, अमित मोहिते, युवराज जाधव, इस्माईल गढवाल, जनराज कदम, किशोर माने, उदय निंबाळकर, गणेश जाधव, शेतकरी पंचगंगा विहार मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.