
घेराव''
77849
जगरनगरातील नागरिकांचा जलअभियंतांना घेराओ
दक्षिण भागात पाण्याचा ठणठणाट; नागरिकांना घ्यावा लागला खासगी टॅंकरचा आधार
कोल्हापूर, ता. २३ ः दहा दिवसांपासून पाणीटंचाईने वैतागलेल्या जगरनगर लेआउट चारमधील नागरिकांनी आज जलअभियंत्यांसह कनिष्ठ अभियंत्यांना घेराओ घातला. अखेर बुधवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, दक्षिण भागात अनेक ठिकाणी सलग दोन-दोन दिवस पाणी आले नसल्याने नागरिकांना खासगी टॅंकरचा आधार घ्यावा लागला.
नागरिकांच्या तक्रारीनुसार चिकोडे यांनी जलअभियंता हर्षजित घाटगे, कनिष्ठ अभियंता प्रिया पाटील, जयेश जाधव यांना बोलावले. त्यावेळी संतप्त नागरिकांनी त्यांना धारेवर धरले. चिकोडे यांनी भागात पाणी केव्हा येणार? पंप वर्षभर नादुरुस्त आहेत तरीही ठोस भूमिका का घेतली नाही? अशी विचारणा करत लेखी दिल्याशिवाय येथून सोडणार नाही, अशी भूमिका घेतली.
जलअभियंता घाटगे यांनी २५ तारखेपर्यंत भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल असे लेखी आश्वासन दिले. त्यावर कनिष्ठ अभियंता, अभियंता यांच्याही सह्या घेतल्या. यावेळी समीर दांडेकर, सलील दांडेकर, अभिजित पाटील, विजय जोशी, संजय देशपांडे, मनाली पाटील, सचिन साळोखे, राजू होले, पी. एम. पाटील, जयसिंग खाडे, एम. आर. कुलकर्णी, शरद विधाते, दिनकर पाटील, मुकुंद वडेर, मुकुंद अभ्यंकर, अमोल शिंदे, अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.
कळंबा, देवकर पाणंदपासून सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर, रिंगरोड अशा अनेक परिसरात तसेच राजारामपुरी, शाहूपुरीतील उंच भागात सलग दोन-दोन दिवस पाणीपुरवठा झालेला नाही. दिवसाआड पाणी येणार असे महापालिकेने सांगितले असले तरी सलग दोन दिवस पाणी येत नसल्याने तीन-तीन दिवस पाण्याचा ठणठणाट जाणवत आहे.