अंबाबाई किरणोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाबाई किरणोत्सव
अंबाबाई किरणोत्सव

अंबाबाई किरणोत्सव

sakal_logo
By

77855
...

अंबाबाई मंदिरात किरणोत्सव मॉडेलचे सादरीकरण

देवस्थान-महापालिकेतर्फे अडथळ्यांची पाहणी : रविवारपासून किरणोत्सवाला होणार प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रविवार (ता. २९) पासून किरणोत्सवाला प्रारंभ होणार आहे. किरणोत्सव कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण क्षमतेने व्हावा, यासाठी आज देवस्थान समिती आणि महापालिका पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. किरणोत्सव मार्गात अजूनही काही अडथळे असून ते दोन दिवसांत काढण्याचा निर्णय यावेळी झाला.
दरम्यान, किरणोत्सवाबाबत गेली काही वर्षे विवेकानंद कॉलेजचे प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरू आहे. त्याआधारे किरणोत्सव मॉडेल तयार झाले असून त्याचे सादरीकरणही यावेळी झाले. देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता मयुरी पटवेगार आदी यावेळी उपस्थित होते.
नवीन वर्षातील पहिला किरणोत्सव स्वच्छ वातावरणामुळे पूर्ण क्षमतेने होतो. मात्र, अजूनही काही अडथळे असल्याचे नोव्हेंबरमधील किरणोत्सवावेळी स्पष्ट झाले. त्यामुळे या अडथळ्यांबाबत महापालिका प्रशासनाला कळवले होते. आजच्या पाहणीनंतर आता हे अडथळे कायमस्वरूपी काढण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे श्री. नाईकवाडे यांनी सांगितले. प्रा. डॉ. कारंजकर यांनी किरणोत्सव मॉडेलबाबतची माहिती दिली. रविवार (ता. २९) पासून नेमका कशा पद्धतीने किरणोत्सव होईल, याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली.

असा होईल किरणोत्सव...

विवेकानंद कॉलेजची टीम गेली काही वर्षे दोन्ही किरणोत्सवाचा अभ्यास करते आहे. त्यातूनच पुढे किरणोत्सव पाच दिवसांचा झाला आणि किरणोत्सवाचे मॉडेलही आकाराला आले आहे. नेहा शिंदे, सिद्धी माने, ऋषी डोंगरे या विद्यार्थ्यांनीही त्यासाठी योगदान दिले आहे. या मॉडेलनुसार आगामी किरणोत्सव वातावरण पूर्णपणे स्वच्छ राहिले तर पूर्ण क्षमतेने होईल. किरणोत्सव काळात कुठल्या दिवशी मावळतीची सूर्यकिरणे महाद्वार, गरूड मंडप, गणपती चौक, कासव चौक, पितळी उंबरा, गाभारा अशा विविध टप्प्यावर नेमकी किती वाजता पोहोचतील, हे अभ्यासातून पुढे आले आहे. रविवारी (ता. २९) मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या पायाच्या वरपर्यंत, तीस व ३१ जानेवारीला मूर्तीच्या चेहऱ्यावर, एक फेब्रुवारीला मूर्तीच्या खांद्यापर्यंत तर दोन फेब्रुवारीला मूर्तीच्या कमरेपर्यंत किरणांचा प्रवास राहील. मात्र, अभ्यासासाठी म्हणून शुक्रवार (ता. २७) पासूनच मावळतीच्या किरणांचा अभ्यासही केला जाणार असल्याचे प्रा. डॉ. कारंजकर यांनी सांगितले. श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवानंतर २१ दिवसांनी जोतिबावरील चोपडाई देवीचा किरणोत्सवही होतो. त्याबाबतही अशाच पद्धतीचे मॉडेल केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
.............
77850

रथाचे काम अंतिम टप्प्यात
अंबाबाई मंदिरातील पितळी उंबऱ्यानजीकचा दरवाजा आणि रथोत्सवासाठीच्या लाकडी रथाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यंदाच्या जोतिबा यात्रेनंतर होणाऱ्या रथोत्सवावेळी हा नवा रथ वापरला जाणार आहे. तत्पूर्वी, तो चांदीने मढवला जाणार आहे. कर्नाटकातील एका भाविकाने दिलेल्या सागवानी लाकडाच्या देणगीतून दरवाजा व रथ साकारला असून पुढील आठवड्यात ही दोन्ही कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय गरूड मंडपाच्या कामालाही लवकरच प्रारंभ होणार असल्याचेही श्री. नाईकवाडे यांनी सांगितले.