
सेविकांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करु नका
77719
...
सेविकांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नका
अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : पोषण ट्रॅकरचे काम न करणाऱ्या सेविकांवर पर्यवेक्षिका दबाव टाकत आहेत. प्रशासनाकडून हे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे; मात्र आपल्या मागण्यांसाठी सेविकांचे आंदोलन सुरूच राहणार असून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये. सध्या मोबाईल परत करण्याचे आंदोलन सुरू आहे, तर २६ जानेवारीपासून राज्यव्यापी बेमुदत संप करणार असल्याचा इशारा राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसने दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष शुभांगी पाटील, अनिता माळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महिला बालकल्याणच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचारी सातत्याने आपल्या हक्कासाठी लढत आहेत; मात्र अंगणवाड्या दत्तक देण्याच्या नावावर खासगीकरण करण्याचा व आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. पोषण ट्रॅकरच्या कामाची सक्ती करण्यात येत आहे. शासनाचा हा प्रकार म्हणजे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे. पोषण ट्रॅकरमधील ऑनलाईन काम योग्य पद्धतीने करता येण्यासाठी शासनाने ताबडतोब चांगल्या क्षमतेचे नवीन मोबाईल उपलब्ध करून द्यावेत. तसेच नवीन मोबाईल मिळेपर्यंत पोषण ट्रॅकर कामाची सक्ती करू नये, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी सेविका व मदतनीसाच्या मानधनातील तफावत कमी करावी, ग्रॅच्युएटीसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, एकरकमी सेवा समाप्ती लाभ पद्धत बदलून सर्वांना थकीत सेवा समाप्तीचा लाभ द्यावा, सादीलवारची रक्कम ६ हजार करून ती मानधनाला जोडून भत्त्याच्या स्वरूपात द्यावी, पाकीटबंद टीएचआर पूर्णपणे बंद करावा, आदी मागण्या करण्यात आल्या.