श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

Published on

फोटो KOP23L77844
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठात सोमवारी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेच्या उद्‍घाटनाप्रसंगी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते नागपूरचा मल्ल साहिल आर. आणि कुरुक्षेत्रचा मल्ल आशिष जगपाल यांच्यात कुस्ती लावण्यात आली. शेजारी शरद बनसोडे, डॉ. दिगंबर शिर्के, दीनानाथसिंह, सुरेशकुमार मलिक आदी. (बी. डी. चेचर : सकाळ छायाचित्रसेवा)
77845
कोल्हापूर ः अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत सोमवारी तिसऱ्या फेरीत ९७ किलो गटात रोहित (लाल पट्टी) आणि हर्षराणा (निळी पट्टी) यांच्यात लढत रंगली.
77848
कोल्हापूर ः अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेत सोमवारी ७९ किलो गटात अनमोल ओरॉन (लाल) आणि हरमनजीत (निळा) यांच्यातील लढतीचा क्षण.


पारंपरिक कुस्तीही विद्यापीठ स्तरावर घ्या
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज; अखिल भारतीय कुस्ती स्पर्धांना प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : बदलत्या काळानुसार मॅटवरील कुस्ती ठीक असले तरी पारंपरिक कुस्ती जपण्याची जबाबदारीही आपण उचलली पाहिजे. त्यासाठी भारतीय विद्यापीठ महासंघाने त्यांच्या क्रीडा कार्यक्रमांसह अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्तरावरील स्पर्धांतही पारंपरिक कुस्तीचा समावेश करावा. यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठात अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. हिंदकेसरी दीनानाथ सिंह प्रमुख उपस्थित होते. श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, ‘‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रोत्साहनामुळेच कुस्तीचा देशभरात प्रसार झाला. जागतिक किर्तीचे मल्ल कोल्हापूरच्या मातीमध्ये घडले. देशभरातील मल्लांसाठी ही प्रेरणाभूमी ठरली.’’ हिंदकेसरी दीनानाथ सिंह म्हणाले, ‘‘आमचा काळ शाळेऐवजी तालमीत जाण्याचा होता. आता मात्र शिक्षण आणि कुस्ती एकत्रितपणे साध्य होत आहे. त्यामुळे मल्लांनी खेळ आणि जीवन यांची उत्तम सांगड घालून या क्षेत्राची सेवा करावी.’’
एआययूचे निरीक्षक डॉ. सुरेशकुमार मलिक यांनी शिवाजी विद्यापीठात सन २००७ मध्ये झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेची आठवण जागविली. पारंपरिक कुस्तीचा एआययूच्या क्रीडा स्पर्धांत समावेश करण्याबाबत विचार करण्याची विनंती कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केली. क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत केले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रकाश कांबळे आणि डॉ. अभिजीत वणिरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. विवेकानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘महाराष्ट्राची लोकपरंपरा’ कार्यक्रम सादर केला.

दिग्गजांचा सत्कार
कुस्तीतील दिग्गज विष्णू जोशीलकर, उत्तमराव पाटील, विनोद चौगुले, बाबासाहेब शिरगावकर, रंगराव हर्णे, नामदेव मोळे, चंद्रकांत चव्हाण, अशोक माने, संभाजी वरुटे, राम सारंग, अक्षय डेळेकर, बंकट यादव, नवनाथ ढमाल, रोहिदास कांबळे, संभाजी पाटील, दिलीप पवार यांचा श्रीमंत शाहू महाराजांच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला.

४६२ लढती रंगल्या
दरम्यान, उद्‍घाटनाच्या कुस्तीत नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा मल्ल साहिल आर. याच्यावर कुरूक्षेत्र विद्यापीठाचा मल्ल आशिष जगपाल याने ९७ किलो वजनी गटात १२-०२ अशी मात केली.न, या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी सोमवारी चार विविध वजनी गटांचे मिळून एकूण ४६२ कुस्त्या रंगल्या. त्यात ६१ किलो गटात १२१, ७० किलो गटात १३३ सामने, ७९ किलो गटात १२० तर ९७ किलो गटात ८८ लढती झाल्या. सकाळी साडेआठपासून सुरू झालेल्या लढती रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com