तिलारी घाटातील अवजड वाहतूक रोखण्याची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिलारी घाटातील अवजड वाहतूक रोखण्याची गरज
तिलारी घाटातील अवजड वाहतूक रोखण्याची गरज

तिलारी घाटातील अवजड वाहतूक रोखण्याची गरज

sakal_logo
By

chd242.jpg
78032
तिलारी ः घाटात अवजड वाहने वळणावर अशी अडकून पडतात. त्यामुळे अन्य वाहतूकही ठप्प होते.
-------------------------------------
तिलारी घाटातील अवजड वाहतूक रोखण्याची गरज
---
वळणावर अडकण्याचे प्रकार; आठवड्यातून किमान दोन वेळा वाहतूक ठप्प
सुनील कोंडुसकर ः सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २४ ः महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या पश्चिम भागाला गोव्याशी जोडणाऱ्या तिलारी घाटात अवजड वाहनांचे प्रमाण वाढले आहे. यू आकाराच्या वळणावर लांबीने मोठी असलेली वाहने वळण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ती संपूर्ण रस्ता अडवून अडकून पडतात. त्याचा परिणाम अन्य वाहतुकीवर होतो. दोन्ही बाजूंना वाहने ठप्प होतात. आठवड्यातून किमान दोन वेळा असे प्रकार घडत आहेत. प्रशासनाने अशा वाहनांना घाटातून प्रवेश बंदी करावी, अशी मागणी होत आहे.
परिसराला गोव्याशी जोडणारा सर्वांत जवळचा मार्ग म्हणून तिलारी घाटाची निवड केली जाते. सुमारे ४० वर्षांपूर्वी केवळ तिलारी जलविद्युत प्रकल्पासाठी लागणारे साहित्य ने-आण करण्यासाठी म्हणून या घाटाची निर्मिती केली होती. त्यामुळे त्याच्या बांधकामासाठी शास्त्रीय निकष वापरलेले नाहीत. त्याच कारणास्तव अनेक वर्षे या घाटातून पाटबंधारे खात्याखेरीज अन्य वाहनांना रस्ता वापरण्यास बंदी होती. चार वर्षांपूर्वी ही बंदी उठवली. त्यामुळे अवजड वाहनधारकही याच घाटाचा वापर करू लागले. या रस्त्याने अंतर वाचते. वाहनांवर चालक म्हणून काम करणाऱ्यांना मालकांकडून नियमित अंतरानुसार इंधनाचे पैसे दिले जातात. तिलारी घाट मार्गाचा वापर केल्यास अंतर कमी असल्याने इंधन बचत होते. त्याचा लाभ चालकाला होतो. मात्र, या घाटात सात ठिकाणी यू आकाराची वळणे आहेत. उतारही मोठा असल्याने अवजड वाहने खूप काळजीपूर्वक हाताळावी लागतात. लांबी जास्त असल्यास या वळणावर वाहन वळू शकत नाही. ते रस्ता व्यापते. पुढे-मागे घेणे अवघड होऊन बसते. वाहन अडकल्यास क्रेन आणून ते बाहेर काढावे लागते. या सर्वांचा त्रास अन्य वाहनधारकांना होतो. हे प्रकार सातत्याने होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाचीही डोकेदुखी बनली आहे. अशा वाहनांना घाटाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर बंदी करावी, अशी मागणी होत आहे.
--------------------
तिलारी घाटात अवजड वाहतूक वाढली आहे. अवजड वाहनांच्या प्रकारांचे वर्गीकरण करून बांधकाम विभागाकडून अशा वाहनांना बंदी असल्याचे नोटिफिकेशन करून घेण्यासंदर्भात पोलिस प्रशासन प्रयत्न करीत आहे.
- संतोष घोळवे, पोलिस निरीक्षक, चंदगड