
जलयुक्त शिवार
78122
कोल्हापूर ः जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अंतर्गत समितीची बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार. शेजारी अन्य.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार; गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवारसाठी ठराव करा
-
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबवा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : जिल्ह्यात जलयुक्त शिवार २.० हे अभियान राबवले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी गुरुवारपासून (ता. २६) प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामसभेत जलयुक्त शिवार २.०, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजना राबविण्याचे ठराव करावेत. जलयुक्त करण्याच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हास्तरीय जलयुक्त शिवार समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अंतर्गत असणाऱ्या समितीची बैठक झाली. यावेळी ते बोलत हते. ते म्हणाले, ‘जलयुक्त शिवारमध्ये जी गावे समाविष्ट करावयाची आहेत त्या गावांची यादी कृषी विभागाने दिली पाहिजे. अपूर्ण पाणलोट क्षेत्र असलेल्या गावांचीही यादी दिली पाहिजे. पाणलोट क्षेत्र व पाण्याच्या ताळेबंदानुसार गावाचा आराखडा तयार करावा. जलसंधारण विभागाने १० फेब्रुवारीपर्यंत जलयुक्तसाठी पात्र असलेल्या गावांची यादी जाहीर केली पाहिजे. १७ फेब्रुवारीपर्यंत ग्राम समितीची स्थापना झाली पाहिजे. २३ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान या अभियानात समाविष्ट ग्राम स्तरावरील सर्व यंत्रणा व ग्राम समिती सदस्यांचा प्रशिक्षण दिले पाहिजे. १५ मार्च ते २५ मार्च या दरम्यान जलयुक्तमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व गावांची शिवार फेरी घेतली पाहिजे.’’
यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी बी. व्ही. अजगेकर, अशोक धोंगे, ऋषिराज गोसकी, जी. ए.भोसले, डॉ. जे. दावीतुराज व वैज्ञानिक संदीप वाघमारे उपस्थित होते.