
पत्नी, प्रियकरासह आठजणांना जन्मठेप
७८०८९
अनुक्रमे आकाश वाघमारे, विजय शिंदे, दिलीप दुधाळे, रवी माने, मणेश कुचकोरवी, किशोर माने, गीतांजली मेनशी, लीना पडवळे.
78099
कोल्हापूर ः खुनातील आरोपींना कळंबा कारागृहात नेताना पोलिस.
78112
मृत नितीन पडवळे
पत्नी, प्रियकरासह आठजणांना जन्मठेप
अनैतिक संबंधातून तरुणाचा खून; शिक्षा झालेल्यांमध्ये आणखी एक महिला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः अनैतिक संबंधात अडथळा असलेल्या नितीन पडवळेचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी आज त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकरासह आठ जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी ही शिक्षा सुनावली. शिक्षेत पत्नीसह दोन महिलांचाही समावेश आहे. संपूर्ण खटला सुरू असताना यातील एका आरोपीचा मृत्यू झाला. अन्य दोघे अद्याप फरार असल्याचे सरकारी वकील समीउलला पाटील सांगितले.
ॲड. पाटील यांनी सांगितले, की पत्नीसह अकरा आरोपींनी नितीन बाबासाहेब पडवळे (तत्कालीन वय ३५, रा. लाईन बाजार, कसबा बावडा) यांचे अपहरण करून खून केल्या प्रकरणी शिक्षा झाली. यामध्ये रवी रमेश माने (तत्कालीन वय २७), दिलीप व्यंकटेश दुधाळे (२९), मनेश सबण्णा कुचकोरवी (३१, तिघे रा. माकडवाला वसाहत, कावळा नाका), विजय रघुनाथ शिंदे (२९, रा. नालासोपारा, ठाणे), किशोर दोडाप्पा माने (२१, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, साळोखे पार्क), आकाश ऊर्फ अक्षय सीताराम वाघमारे (१९, रा. राजारामपुरी १४ वी गल्ली), लीना नितीन पडवळे (३०, रा. लाईन बाजार, कसबा बावडा) आणि गीतांजली विरुपाक्ष मेनशी (३०, रा. शेवटचा बसस्टॉप शांतीनगर, पाचगाव) या आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली. याच गुन्ह्यातील सतीश भीमसिंग वडर (रा. सायबर चौक, राजारामपुरी) आणि इंद्रजित ऊर्फ चिल्या रमेश बनसोडे (रा. कावळा नाका, कोल्हापूर) अद्याप फरारी आहेत. मृत पडवळे याचे शीर धडावेगळे करणारा अमित चंद्रसेन शिंदे (२३, रा. विक्रमनगर व्यायामशाळेजवळ कोल्हापूर) याचा सुनावणी सुरू असताना मृत्यू झाला आहे.
लीना नितीन पडवळे आणि रवी माने यांचे प्रेमसंबंध होते. प्रेमाला अडथळा ठरलेल्या नितीनचा खून करण्याचे ठरले. रवीने दिलीपशी चर्चा करून अमित शिंदे याची भेट घेऊन दीड लाख रुपयांना सुपारी दिली. हॉटेलमध्ये नितीनच्या खुनाचा कट रचला. त्यानुसार १२ जानेवारी २०११ ला आर. के. नगर येथील खडीचा गणपती मंदिर येथून नितीनला बोलावून घेऊन मारहाण केली. मोटारीतून अपहरण केले. त्यानंतर सर्वजण वाठार-बोरपाडळे मार्गे विशाळगड रोडवर मानोली गावच्या जंगलात वाघझरा येथे पोहोचले. नंतर शिर धडावेगळे करून मृतदेह दरीत फेकला. शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तत्कालीन पोलिस निरीक्षक डी. एस. घोगरे यांनी तपास करून दोषारोप पत्र दाखल केले होते.
आरोपी अमित शिंदेने नितीनचे शिर, शर्ट, मोबाईल हॅण्डसेट असे कॅरीबॅगमध्ये घातले. त्याचे धड खोल दरीत टाकून दिले. खून होताच अमितने रवीला फोन करून तुझे काम झाले आहे, आम्ही वारणा नदी येथे येत असल्याचे सांगितले. नितीनची खडीच्या गणपती मंदिर येथे पडलेली मोटारसायकल घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर मोटारसायकल आणि उर्वरीत शिर, शर्ट, मोबाईल यासह अन्य साहित्य वारणा नदीच्या पात्रात टाकून दिले.
दुपारी शिक्षा सुनावणीवेळी घरी आई-वडील वयोवृद्ध आहेत, लहान मुले आहेत, पत्नी आहे. त्यामुळे कमीत कमी शिक्षा मिळावी, अशी मागणी आरोपींनी न्यायालयात केली. शिक्षा सुनावल्यानंतर आरोपींच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला.
सायंकाळी पाचच्या सुमारास आरोपींनी न्यायालयातून बाहेर काढताना प्रचंड पोलिस बंदोबस्त होता. तेथे गर्दीही झाली होती. अशीच गर्दी पुढे सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करतानाही झाली होती. त्यामुळे काय झाले आहे, अशी विचारणा रस्त्यावरून जाणारेही करत होते.
सुनावणीत २१ साक्षीदार तपासले. साक्षीदार आणि पंचांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. त्यांना जामीनही झाला होता.
- समीउलला पाटील; सरकारी वकील
घटनाक्रम असा...
०) गीतांजलीने नितीनला ११ जानेवारी २०११ मध्ये आर. के. नगर येथे बोलावून अपहरण करून त्या दिवशी खून केला
०) शाहूपुरी पोलिस ठाण्यात नितीन पडवळे बेपत्ता असल्याची फिर्याद १४ जानेवारीस दाखल
०) शाहूवाडी तालुक्यातील आंबा ते विशाळगड रस्त्यावरील वाघझरा दरीमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह २१ जानेवारीस सापडला
०) २४ जानेवारी २०२३ ला न्यायालयाने शिक्षा सुनावली