
भीमा प्रदर्शन
78242
भीमा कृषी प्रदर्शन आजपासून
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानासह साहित्यांची माहिती मिळावी यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने भरवण्यात येत असलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाची सुरूवात उद्यापासून (ता. २६) कसबा बावडा रोडवरील मेरी वेदर मैदानावर होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे प्रदर्शन असल्याचा दावा संयोजकांचा आहे. २९ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन असेल.
दरम्यान, हरियाणातील १२ कोटींचा बादशहा नावाचा रेडा आणि ३१ लिटर दूध देणारी बिजली नावाची म्हैस, तृणधान्याचे स्वतंत्र दालन ही या प्रदर्शनाचे खास आकर्षण आहेत.
उद्घाटन उद्या (ता. २६) दुपारी १२ वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, प्रभास फिल्मचे संग्राम नाईक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, तसेच सुहास देशपांडे उपस्थित राहणार आहेत. २८ जानेवारीला प्रदर्शनाला केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी भेट देणार आहेत. प्रदर्शनामध्ये ४०० पेक्षा अधिक स्टॉलचा समावेश आहे. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली २०० बचत गटांना मोफत स्टाल दिले आहेत. चार दिवस या ठिकाणी शेतकऱ्यांना भागीरथी महिला संस्थेतर्फे मोफत झुणका-भाकरी दिली जाणार आहे.
वाहतूक मार्गात बदल
प्रदर्शनामुळे कसबा बावडा रोडवरील वाहतूक मार्गात बदल केले आहेत. आवश्यकता वाटल्यास महावीर कॉलेज ते पोस्ट ऑॅफिस मार्गावरील वाहतूक जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे, तर पोस्ट ऑफिस ते महावीर कॉलेज मार्गावरील वाहतूक पितळी गणपतीमार्गे वळवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी दिली. याच रस्त्यावर दुतर्फा दुचाकी, तर चारचाकी वाहनांसाठी होमगार्डचे मैदान व पितळी गणपती परिसर राखीव ठेवण्यात येणार आहे.
..........