
शरद पवार पत्रकार परिषद बातमी
‘वंचित’बाबत चर्चा नाही
शरद पवार : भाजपविरोधी मोट बांधण्याचे प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः शिवसेनेचा ठाकरे गट आणि ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये युती झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळाले होते. यानिमित्ताने महाविकास आघाडीमध्ये नवा भिडू आल्याची चर्चा होती; पण रोखठोक विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या आंबेडकर यांनी शरद पवार यांचा संबंध थेट भाजपशी जोडल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघेही सावध झाले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ‘वंचित’ला सोबत घेण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीबाबत कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर आलेला नाही. सध्यातरी महाविकास आघाडी म्हणून निवडणुकांना सामोरे जावे, अशी आमची मानसिकता आहे, असे पवार यांनी सांगितले.
आज (ता. २८) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशातील वातावरण केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या विरोधात असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणामुळे दिसून आले आहे. भाजपविरोधात राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची मोट बांधण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभेच्या अधिवेशनानिमित्त सर्वजण दिल्लीमध्ये एकत्र येतील त्यावेळी याबाबतची चर्चा होईल, असे श्री. पवार यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘नुकतेच जे सर्वे प्रसिद्ध झाले, त्यामध्ये देशात जे सत्ताधारी आहेत त्यांच्याविरोधात जनमत असल्याचे दिसते. महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाच्या हातात सत्ता पुन्हा जाईल असे दिसत नाही. सर्व्हे करणाऱ्या एजन्सीची अचूकता अधिक आहे. लोक परिवर्तनाला उत्सुक आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरातील विरोधकांची मोट बांधण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून चर्चा होत आहेत. मी स्वतः अनेकांशी बोलतो. त्यांना एकत्र आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, प्रत्येक ठिकाणी काही ना काही अडचणी आहेत. केरळमध्ये डावे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत आहेत. तेथे आमचा मुख्य विरोधक काँग्रेस आहे. राष्ट्रीय पातळीवर आम्ही काँग्रेसला बरोबर घेऊ इच्छितो. अशा पद्धतीने काही ना काही स्थानिक मुद्दे आहेत. ते सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. दोन दिवसांनी लोकसभा अधिवेशनाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतील. त्यावेळी चर्चा होईल. चंद्रशेखर राव यांच्याबरोबर सुसंवाद सुरू आहे. देशातील सर्व विरोधकांनी एकत्र यावे, अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी ते सुद्धा प्रयत्न करत आहेत. ‘ईडी’सारख्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर केंद्र सरकारकडून सुरू आहे. केंद्र सरकार ममता बॅनर्जींना कोणत्या ना कोणत्या एजन्सीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही त्यांची राष्ट्रीय राजकारणातील भूमिका स्पष्ट आहे.’
यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, आमदार राजेश पाटील, बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, अनिल साळोखे, माजी नगरसेवक आदिल फरास हे उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांना आताच का सुचले?
पोटनिवडणुकीबाबत पवार म्हणाले, ‘पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी हे चंद्रकांत पाटील यांना आताच का सुचले. यापूर्वी कोल्हापूर, नांदेड, पंढरपूर या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या त्यावेळी चंद्रकांत पाटील यांना बिनविरोध करावे असे का सुचले नाही. कसबा आणि पिंपरी चिंचवडच्या पोट निवडणुकीतच का सुचले हे कळत नाही?’
कायदा सुव्यवस्थेवर लक्ष हवे
राज्यातील परिस्थितीविषयी पवार म्हणाले, ‘पंचायत राजमधील जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद या सर्व निवडणुका थांबविण्यात आल्या आहेत. कधी तरी याचा निकाल लावला पाहिजे. सामान्य माणूस या संस्थांशी थेट जोडलेला आहे. लोकप्रतिनिधी येण्यासाठी जी खबरदारी घेतली पाहिजे ती घेतली जात नाही. सामान्य माणसाच्या मतदानाचा अधिकार डावलला जात आहे. गुन्हेगारीच्या अनेक बातम्या वाचायला मिळतात. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेकडे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.’