सर्वसामान्यांचे आश्रू पुसणारा निष्‍ठावान नेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वसामान्यांचे आश्रू पुसणारा निष्‍ठावान नेता
सर्वसामान्यांचे आश्रू पुसणारा निष्‍ठावान नेता

सर्वसामान्यांचे आश्रू पुसणारा निष्‍ठावान नेता

sakal_logo
By

78702

सर्वसामान्यांचे अश्रू पुसणारा निष्‍ठावान नेता

खासदार शरद पवार ः संपतबापू यांचा अमृतमहोत्‍सव थाटात

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २८ : ‘सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्यासाठी आयुष्य खर्ची घालणारे निष्‍कलंक नेतृत्‍व अशीच ओळख माजी आमदार संपतबापू पवार-पाटील यांनी समाजासमोर निर्माण केली आहे’, असे गौरवोद्गार राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काढले. संपतबापू पवार-पाटील यांच्या अमृतमहोत्‍सवानिमित्त आयोजित नागरी सत्‍कारावेळी ते बोलत होते.

शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्री. पवार- पाटील यांचा पत्नी संजीवनी यांच्यासमवेत मानपत्र, सन्‍मानचिन्‍ह, शाल व श्रीफळ देऊन सत्‍कार करण्यात आला. याप्रसंगी सांगरुळ मतदारसंघासह राज्यातील शेकापच्या हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. सडोली खालसा (ता. करवीर) येथील छत्रपती शिवाजीराजे क्रीडांगणावर कार्यक्रम झाला.
राष्‍ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, जयंत आसगावकर, अरुण लाड, माजी आमदार संजय घाटगे, के. पी. पाटील, सत्यजित पाटील- सरुडकर, चंद्रदीप नरके, उल्‍हास पाटील, वैभव नायकवडी, राष्‍ट्रवादीचे जिल्‍हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासह पवार-पाटील कुटुंबातील अशोकराव पवार- पाटील, मुलगा क्रांतिसिंह, तसेच मुली ऐश्‍‍वर्या व गीतांजली उपस्‍थित होत्या.

शरद पवार म्‍हणाले, ‘देशाला स्‍वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष केला. यानंतर स्वातंत्र्य मिळाले. मात्र, खरे स्‍वातंत्र्य सर्वसामान्यांच्या आयुष्‍यात दिसण्याबाबत नेत्यांच्यात मतभेद झाले. त्यातून विविध चळवळी उभ्या राहिल्या. याचाच एक भाग म्‍हणून भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा उदय झाला. या पक्षाचे एक घटक म्‍हणून संपतरावांनी केलेले काम हे आदर्शवत आहे. सर्वसामान्यांच्या हक्‍काचे रक्षण करण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले. १० वर्षे विधिमंडळात गोरगरीब जनतेचा आवाज बनून त्यांनी काम केले. सत्ता असो किंवा नसो, जनतेच्या हक्कासाठी ते संघर्ष करीत राहिले. हद्दवाढ असो की पाणीपट्टी, वीजदरवाढ असो की शिक्षणातील नवे धोरण, या सर्व लढ्यांचे नेतृत्‍व संपतरावांनी केले. साखर कारखान्यात सत्ता असताना एका थेंबाचाही शिंतोडा उडेल, असे चुकीचे काम न करणारा हा निर्मळ नेता आहे.’ अमृतमहोत्‍सवाचे औचित्य साधून संपतबापू यांची ग्रंथतुला करण्यात आली. तसेच त्यांच्या जीवन संघर्षावर आधारित दोन पुस्‍तकांचे प्रकाशन श्री. पवार यांच्या हस्‍ते करण्यात आले.
...

खत कारखानाप्रश्नी मदत करू

‘संपतबापू यांनी खत कारखान्याचा प्रश्‍‍न मांडला. त्याची माहिती नाही, याबाबतची माहिती घेतली जाईल. हा कारखाना सुरू करण्यासाठी ज्यांच्याकडून मदत घेणे शक्य आहे, ती सर्व घेऊन संपतबापूंचे दु:ख दूर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्‍वाही खासदार पवार यांनी दिली.
....
......

78701

गोरगरिबांच्या हक्‍कासाठी
अजूनही मैदान सोडलेले नाही

कोल्‍हापूर : सांगरुळ मतदारसंघातील गोरगरिबांनी १० वर्षे विधिमंडळात पाठवले. आता ६० हजार रुपये पेन्‍शन मिळतेय; पण ज्यांच्यामुळे मला ही पेन्‍शन मिळाली, त्यांचे दु:ख दूर झाले का, असा प्रश्‍‍न करत अजूनही मैदान सोडलेले नाही. संघर्षाचा पवित्रा आजही कायम असल्याचे प्रतिपादन माजी आमदार संपतबापू पवार- पाटील यांनी केले. ते म्‍हणाले, ‘गोरगरिबांसाठी लढण्याचा वारसा आजोबांपासून मिळाला. धनगरवाड्यावरील लोकही हक्‍काने बापू तू हे काम केलंस का, असे विचारायचे. त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचे दु:ख समजून घेऊन काम केले. आयुष्यात अनेक जिवाभावाची माणसं भेटली. मात्र, त्यांचे दु:ख काही कमी झाले नसल्याची खंत आहे.’
शेकापचे आमदार जयंत पाटील म्‍हणाले, ‘संपतबापूंचा पक्षातील शब्‍द हा अंतिम असतो. हीच त्यांची आयुष्यभराची शिदोरी आहे.’ ‘सत्तेत नसतानाही संपतबापूंच्या मागे हजारोंच्या संख्येने लोक येतात, ही त्यांच्या कामाची पुण्याई असल्याचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. खासदार संजय मंडलिक यांनी बापूंचे कार्य हे आमच्यासह पुढील पिढीस मार्गदर्शक असल्याचे सांगितले.

...
हद्दवाढीच्या भूमिकेत किंचित बदल करा

‘हद्दवाढ ही कोल्‍हापूर शहराची गरज आहे. त्यामुळे संपतबापूंनी आपल्या स्‍वभावात किंचित बदल करावा’, अशी विनंती आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. शहराभोवती असणारी छोटी गावे हद्दवाढीत आली पाहिजेत. यासाठी संपतबापू, आमदार पी. एन. पाटील, चंद्रदीप नरके यांनी सकारात्‍मक भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.