एमआयडीसीतील नियमबाह्य, विनावापर भूखंड त्वरीत ताब्यात घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमआयडीसीतील नियमबाह्य, विनावापर भूखंड त्वरीत ताब्यात घ्या
एमआयडीसीतील नियमबाह्य, विनावापर भूखंड त्वरीत ताब्यात घ्या

एमआयडीसीतील नियमबाह्य, विनावापर भूखंड त्वरीत ताब्यात घ्या

sakal_logo
By

(KOP23L78796)
...........

विनावापर भूखंड त्वरित ताब्यात घ्या

उद्योगमंत्री उदय सामंत; ‘मिशन’ ठरवून काम करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः एकीकडे उद्योगविस्ताराला जागा नसल्याचे उद्योजक सांगत आहेत आणि दुसरीकडे एमआयडीसीतील काही भूखंड नियमबाह्य, विनावापर अनेकांच्या ताब्यात आहेत. असे भूखंड त्वरित ताब्यात घ्या. यासह कोणत्याही कामासाठी वारंवार मुख्यालयाचे कारण सांगू नका, तर ‘मिशन’ ठरवून काम करा. उद्योजकांचे प्रश्‍न सोडवा’, अशी सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योग विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना केली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरतर्फे हॉटेल सयाजी येथे कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यात ‘मॅक’चे अध्यक्ष हरिश्‍चंद्र धोत्रे, ‘स्मॅक’चे उपाध्यक्ष एम. वाय. पाटील, ‘गोशिमा’चे अध्यक्ष दीपक चोरगे, ‘कोल्हापूर चेंबर’चे संचालक विद्यानंद मुंढे, उद्यम सोसायटीच्या अध्यक्षा संगीता नलवडे, इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष हर्षद दलाल, मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन साताराचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते, उद्योजक प्रकाश मालाडकर आदींनी औद्योगिक क्षेत्राच्या समस्या मांडल्या. त्यावर मंत्री सामंत यांनी चर्चा केली.
‘शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-पंचतारांकित एमआयडीसींमध्ये जागा असूनही अद्याप ट्रक टर्मिनल झाले नाही ते योग्य नाही. पारंपरिक कामकाजाच्या पद्धतीतून बाहेर या’, अशी सूचना मंत्री सामंत यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना केली. ट्रक टर्मिनल, पंचतारांकित एमआयडीसीतील ओएस इलेव्हन प्लॉट वितरणाला स्थगिती, पोलिसांच्या पेट्रोलिंगसाठी वाहने देणे, टोप आणि सातारा येथील महावितरणच्या उपकेंद्राला जागा, एमआयडीसींमधील कचरा उठाव, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, आदींबाबत मंत्री सामंत यांनी त्वरित निर्णय घेऊन पुढील कार्यवाहीबाबत संबंधितांना सूचना केली.
अनेक वर्षांपासून रखडलेले, प्रलंबित असलेले प्रश्‍न या बैठकीत मार्गी लागले असून, उद्योजकांनी समाधान व्यक्त केल्याचे ‘महाराष्ट्र चेंबर’चे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, कार्यकारी अभियंता अतुल ढोरे, अधीक्षक अभियंता राजेंद्र गावडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, ‘स्मॅक’चे अध्यक्ष दीपक पाटील, उद्योजक सुरेंद्र जैन, मोहन मुल्हेरकर, सत्यजित जाधव, ‘बाळासाहेबांची शिवसेना’चे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने आदी उपस्थित होते. उपअभियंता आय. ए. नाईक यांनी सूत्रसंचालन केले.
...

़़़़‘फायर स्टेशन’चा निधी प्रस्ताव पाठवा

गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील फायर स्टेशनच्या प्रश्‍नाकडे दीपक चोरगे, विद्यानंद मुंढे यांनी लक्ष वेधले. त्यावर या स्टेशन उभारणीसाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव त्वरित माझ्याकडे पाठवून द्या. त्याला लगेच मंजुरी दिली जाईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
...

वीजदराबाबत लवकरच बैठक घेणार

महावितरण कंपनीने विजेची दरवाढ करू नये. पुढील तीन वर्षांसाठी दर निश्चित ठेवावेत, अशी मागणी औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर याबाबत उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्र्यांसोबत औद्योगिक संघटनांच्या शिष्टमंडळाची लवकरच बैठक घेण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.