
वाघबीळ येथे खून नाही चर्चा...
78834
...
वाघबीळ येथे खुनाची केवळ चर्चाच
नशेतील संशयिताच्या रक्ताचे घेतले नमुने
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः पन्हाळा-कोल्हापूर रस्त्यावर वाघबीळजवळ रक्ताने हात माखलेली एक व्यक्ती, हातात खुरपे आणि शेजारी रक्ताचे डाग असल्याचे आज सकाळी दिसून आली. त्याने एका महिलेचाही खून करून स्वतः हाताची नस कापून आत्महत्या करीत असल्याची चर्चा होती. मात्र, असा कोणताच प्रकार घडला नसून नशेत त्याने हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती करवीर पोलिसांनी दिली. तसेच चौकशीसाठी प्रवीण विष्णू कांबळे (वय ४३, रा. नाटोली-चिखली, ता. शिराळा, जि. सांगली) याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, घटनास्थळी पडलेले रक्त आणि त्याचे रक्त यांचे नमुने पोलिसांनी तपासणीसाठी घेतले आहेत. त्याने महिलेचा खून केला आहे काय याचा तपास सुरू आहे. प्रथमदर्शनी असे काहीच दिसून येत नाही. तरीही मृतदेह शोधण्यासाठी वाघबीळचा संपूर्ण डोंगर करवीर, कोडोली आणि पन्हाळा पोलिसांनी पिंजून काढला. पुढील तपासात शिराळा आणि पन्हाळा परिसरात कोणी बेपत्ता आहे काय याचीही माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगितले.
घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वाघबीळ-पडवळवाडी परिसरात रस्त्याकडेला एका व्यक्तीच्या हातातून रक्त येत होते. त्याच्या हातात खुरपे होते. रस्त्याकडेलाच सिमेंटच्या कंपाऊंडवर रक्त होते. एका महिलेचे नाव लिहून ‘तू परत ये...’ असे एका पोत्यावर रक्ताने लिहिलेले पाहून तेथून प्रवास करणाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्याने एका महिलेचा खून केल्याची चर्चा असल्यामुळे पोलिसांनी एकच धावपळ उडाली. तातडीने पन्हाळा, कोडोली आणि करवीर पोलिस ठाण्याचा फौजफाटा तेथे पोहोचला. त्यांनी कांबळेला ताब्यात घेऊन उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी वाघबीळचा अख्खा डोंगर पिंजून काढला. मात्र कोठेही मृतदेह मिळाला नाही. त्यामुळे खुनाची केवळ चर्चाच होती, असा कोणताच प्रकार घडला नसल्याचे आज दिसून आले. तरीही पोलिसांकडून तपास सुरूच राहणार आहे.
------
संशयित दोन दिवसांपासून बेपत्ता
कांबळेची अंगझडती घेतली तेव्हा त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रावरून त्याच्या घरी याची माहिती दिली. त्याचा मोठा भाऊ कोल्हापुरात आला. त्याने कांबळे हा एका साखर कारखान्यात कामाला असून त्याला दारूचे व्यसन आहे. तो दोन दिवस बेपत्ता होता. आज पोलिसांचा फोन आल्यामुळे येथे आल्याचे सांगितले. नेमके काय घडले आहे, याची कोणतीच कल्पना कांबळेला नसल्याचे तो पोलिसांना सांगतो, असेही पोलिसांनी सांगितले.