
नोकरी भरतीची जबाबदारी आयबीपीएसकडे
लोगो-
जिल्हा परिषद
---
नोकरी भरतीची जबाबदारी ‘आयबीपीएस’कडे
---
२० पदांच्या ७७४ जागा रिक्त; पुढील महिन्यात प्रक्रिया
कोल्हापूर, ता. ३० : बहुचर्चित जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीला गती मिळाली आहे. यापूर्वी नोकरभरतीसाठी टीसीएस कंपनीची निवड केली होती. मात्र, कमी वेळेत ही भरती ‘टीसीएस’कडून होणे शक्य नसल्याने आता आयबीपीएस कंपनीची निवड केली आहे. जिल्हा परिषदेने नुकताच आयबीपीएस कंपनीशी करार केला. एकूण ७७४ जागांसाठी ही भरती होणार असून, पुढील महिन्यात भरतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने नोकरभरती करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार सर्व विभागांनी रिक्त जागांची संख्या शासनाकडे कळवली. यानंतर शासनाने जिल्हास्तरावरच नोकरभरतीची प्रक्रिया पार पाडण्यास सांगितले. नोकरभरतीसाठी शासनाने काही कंपन्या निश्चित केल्या आहेत. यात जिल्हा परिषदेने पहिल्यांदा टीसीएस कंपनीकडे नोकरभरतीचे काम देण्याचा निर्णय घेतला. मात्र, कंपनीकडे बरेच काम असल्याने त्यांच्याकडून वेळेत काम होण्याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे या निर्णयात बदल करून आता हे काम आयबीपीएस कंपनीकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कराराची प्रक्रियाही झाली आहे.
जिल्हा परिषदेकडील विविध २० पदांच्या ७७४ जागा रिक्त आहेत. यात ग्रामसेवकापासून विस्तार अधिकाऱ्यांपर्यंत आणि आरोग्यसेवकापासून कनिष्ठ लेखाधिकारी, अभियंत्यांपर्यंतच्या जागांचा समावेश आहे. गेली अनेक वर्षे ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे हजारो उमेदवार परीक्षेची वाट पाहत आहेत. जिल्हा परिषदेने रिक्त सर्व जागांची पडताळणी करून यादी तयार केली. यानुसार आता कंपनीकडून परीक्षेचे आयोजन केले जाईल. परीक्षा केंद्राची निवड, पेपर यापासून ते निकाल तयार करून गुणवत्ता यादी देण्यापर्यंतची जबाबदारी कंपनीची राहील. केवळ निवड झालेल्या उमेदवारांना पदस्थापना देण्याची जबाबदारी फक्त जिल्हा परिषदकडे राहणार आहे.