वेतन अनुदानाचा आदेश तात्काळ काढा, अन्यथा परीक्षा कामकाजावर बहिष्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेतन अनुदानाचा आदेश तात्काळ काढा, अन्यथा परीक्षा कामकाजावर बहिष्कार
वेतन अनुदानाचा आदेश तात्काळ काढा, अन्यथा परीक्षा कामकाजावर बहिष्कार

वेतन अनुदानाचा आदेश तात्काळ काढा, अन्यथा परीक्षा कामकाजावर बहिष्कार

sakal_logo
By

79278
कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी राज्य (कायम) विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या सदस्य शिक्षकांनी माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्रवेशद्वारात धरणे आंदोलन केले.

...अन्यथा परीक्षा कामकाजावर बहिष्कार
विनाअनुदानित शिक्षकांचा इशारा; ‘माध्यमिक’च्या प्रवेशद्वारात आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार वेतन अनुदानाचा आदेश तत्काळ काढा, अन्यथा परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकू, असा इशारा विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांनी आज दिला. विविध प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्रवेशद्वारात धरणे आंदोलन केले.
प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने आंदोलनकर्त्या शिक्षकांनी घोषणा दिल्या. शिक्षण मंडळाचे प्रभारी विभागीय सहसचिव डी. एस. पोवार यांना मागण्यांचे निवेदन दिले. वेतनासाठी लागणाऱ्या निधीला नागपूर येथील हिवाळी अधिवेशन २०२२ मध्ये शासनाने मंजुरी दिली आहे. हा निधी ३१ मार्च २०२३ पर्यंत खर्च न झाल्यास हा निधी परत जाणार आहे. पण, राज्यातील जवळपास टप्पा अनुदानित शाळेतील ६० हजार कर्मचारी, तर अघोषीत शाळेतील सुमारे ३५ हजार शिक्षकांचे नुकसान होणार आहे. मंत्रालयातील दप्तर दिरंगाईचा फटका बसत आहे. त्यामुळे वेतन अनुदानाचा आदेश १५ फेब्रुवारीपूर्वी काढावा. प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी. अन्यथा दहावी, बारावीच्या परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा खंडेराव जगदाळे आणि रत्नाकर माळी यांनी दिला. या आंदोलनात चंद्रकांत बागणे, जयसिंग जाधव, बाजीराव बरगे, अविनाश कुदळे, वर्षा वाडकर, भारती कदम, वैशाली पाटील, रुचिरा कांबळे, शुभांगी जगदाळे, सुनील कल्याणी, प्रकाश पाटील, गजानन काटकर आदी सहभागी झाले.
------------
प्रमुख मागण्या
- त्रुटी पूर्तता शाळांची यादी मंजूर निधीसह तत्काळ घोषित करावी
- अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची यादी मंजूर निधीसह तत्काळ घोषित करावी
- सध्या २०, ४० टक्के अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना मंजूर केलेला वाढीव २० टक्के टप्पाचा शासन आदेश मंत्रिमंडळ मंजुरी तारखेपासून पूर्वलक्षी प्रभावाने तत्काळ काढावेत
- त्रुटी पूर्तता केलेल्या उच्च माध्यमिक शाळा व प्रथमच घोषित होणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे पगार ऑफलाईन पद्धतीने करावेत