
नितीन गडकरींच्या भाषणाने विकासाची नवी चर्चा सुरू
नितीन गडकरींच्या भाषणाने
विकासाची नवी मांडणी
प्रदूषणमुक्त स्मार्ट शहर; उड्डाणपूल उभारणी ऐरणीवर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बास्केट ब्रिजची पायाभरणी झाली. यावेळी नितीन गडकरी यांनी स्मार्ट शहराची संकल्पना सर्वांसमोर ठेवली. या निमित्ताने शहरातील उड्डाणपूल, भुयारी मार्ग, इलेक्ट्रीक बस यांची चर्चा सुरू झाली. महापालिका, राज्य सरकार आणि केंद्रातील योजना यांचा समन्वयाने विचार झाला, तर या विकासाच्या नव्या मांडणीने कोल्हापूरही देशातील नियोजित शहरांच्या यादीमध्ये येऊ शकेल.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पायाभरणीच्या कार्यक्रमात भाषणातून शहर आणि जिल्ह्याच्या विकासाची संकल्पना मांडली. यामध्ये त्यांनी प्रदूषणमुक्त स्मार्ट शहर, औद्योगिकरणासाठी गुंतवणूक आणि भविष्यातील गरज ओळखून पायाभूत सुविधांचा विकास याबाबत विवेचन केले. त्यानंतर विकासाच्या एका नव्या चर्चेला प्रारंभ झाला आहे. शहराचा विकास आराखडा करताना पुढील शंभर वर्षांचा विचार केला गेला पाहिजे. यासाठी शहराभोवतीचे रिंगरोड, शहरातील उड्डाणपूल, भुयारी मार्ग, उद्यानांचे सुशोभीकरण याचा विचार त्यांनी मांडला. तसेच राष्ट्रीय महामार्गाशी संलग्न असणारे रिंगरोड, उड्डाणपूल यांच्यासाठी आवश्यक तेवढा निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या निमित्ताने पुन्हा प्रस्तावित उड्डाणपूल आणि रिंगरोडचा मुद्दा ऐरणीवर आला. शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक बसेसचा विचार गडकरींनी मांडला. या बस डिझेलपेक्षा कमी खर्चात चालतात. याचा प्रस्ताव पाठवल्यास ७५ बसेस उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. किल्ल्यांवरील रोप वे, सांगली-कोल्हापूर मार्ग सिमेंटचा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. कचरा, सांडपाणी यांच्या नियोजनावरही त्यांनी भाष्य केले. शहरातील कचरा आणि सांडपाणी उत्पन्नाचे साधन होऊ शकते. एकूणच गडकरींच्या भाषणानंतर विकासाच्या नव्या चर्चेला प्रारंभ झाला.
----------------
शहर, जिल्ह्यासाठी प्रस्तावित मागण्या
- ७५ इलेक्ट्रीक बस
- राष्ट्रीय महामार्गाशी संलग्न असणारे उड्डाणपूल
- शहर सुशोभीकरणासाठी केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी
- राष्ट्रीय महामार्गाशी संलग्न असणाऱ्या रिंगरोडसाठी निधी
- किल्ल्यांवर जाण्यासाठी रोप वे
- पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्राचा निधी
---------------
कोट
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची ओळख विकास पुरुष अशी आहे. त्यांनी शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठीचा एक मार्ग सगळ्यांसमोर ठेवला. यासाठी निधीची उपलब्धता करण्यासाठीचे ठोस आश्वासन त्यांनी दिले आहे. भविष्यात केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
- धनंजय महाडिक, खासदार.