
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यामूर्तींचा सत्कार
79644
कोल्हापूरला सर्किट बेंच होणे गरजेचे
कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती वराळे; जिल्हा बार असोसिएशनतर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नुकतीच नियुक्ती झालेले प्रसन्ना बी. वराळे यांचा सत्कार आज जिल्हा बार असोसिएशनने केला. यावेळी कोल्हापुरात सर्किट बेंच झाले पाहिजे, असे मत वराळे यांनी व्यक्त केले. शासकीय विश्रामगृहात सत्कार करण्यात आला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती टी. व्ही. नलवडे उपस्थित होते.
जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे उपाध्यक्ष ॲड. विवेक घाटगे यांचे हस्ते श्री. वराळे व त्यांच्या पत्नी यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे न्यायमूर्ती म्हणून कामकाज पहिले आहे. खंडपीठ कृती समितीची जेव्हा मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांचा बरोबर बैठक झाली तेव्हा श्री. वराळे उपस्थित होते. त्यामुळे त्यांना कोल्हापूर सर्किट बेंच प्रश्न पूर्ण माहीत आहे. मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांना जिल्हा बार असोसिएशनतर्फे सर्किट बेंच स्थापनेबाबत निवेदन देण्यात आले. तसेच कोल्हापूर येथे नवोदित वकिलांकरिता जिल्हा बार असोसिएशन व बार कौन्सिल मार्फत मार्चमध्ये होणारे मार्गदर्शन परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे निमंत्रण देण्यात आले.
कोल्हापूर येथे सर्किट बेंच होणे ही काळाची गरज आहे. माझा कोल्हापूर सर्किट बेंच मागणीला कायम पाठिंबा आहे, असे श्री. वराळे यांनी सांगितले. तसेच ज्युनिअर वकिलांसाठी विविध योजनांचा विचार होण्यासाठी राज्य शासन, न्यायव्यवस्था, बार कौन्सिल यांच्यामार्फत प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले
यावेळी बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. महादेवराव अडगुळे, जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, सचिव विजयकुमार ताटे-देशमुख, माजी अध्यक्ष ॲड. संपतराव पवार, ॲड. अजित मोहिते उपस्थित होते.