
लाचलुचपत प्रतिबंधात्मक फलक दर्शनी भागात लावा ः सरदार नाळे
79645 सरदार नाळे
लाचलुचपत प्रतिबंधाचे फलक
दर्शनी भागात लावावेत
पोलिस उपाधीक्षक नाळे; शासकीय कार्यालयांचे सर्वेक्षण करणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः सर्व शासकीय कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधात्मक कारवाईची माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावणे अपेक्षित आहेत. याबातची पाहणी करून ज्या कार्यालयात दर्शनी भागात फलक नाहीत, त्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाचे नवे उपाधीक्षक सरदार नाळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
नाळे म्हणाले, ‘शासकीय कार्यालयात नागरिकांची अडवणूक करून त्यांच्याकडे लाच मागणे हा कायदेशीर गुन्हा आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधात्मक कारवाईची माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. या फलकावर लाच मागणे हा गुन्हा आहे. त्यासंबंधात कोणत्या विभागात तक्रार करावी. त्यासाठीचा संपर्क क्रमांक ही सर्व माहिती असते. बहुतांश शासकीय कार्यालयात हा माहिती फलक आतल्याबाजूंना लावलेला असतो. त्यामुळे तो दृष्टिपथात येत नाही. याबाबत शासकीय कार्यालयांचे सर्वेक्षण करून ज्या कार्यालयात दर्शनी भागात हे फलक नसतील त्यांना नोटीस काढली जाणार आहे. नागरिकांनी त्यांच्याकडे शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांनी लाचेची मागणी केल्यास १०६४ या क्रमांकावर फोन करावा. त्यांची तक्रार गोपनीय ठेवून लाचेची मागणी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल. नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता तक्रारीसाठी समोर यावे.’
चौकट
तुमचे काम तटणार नाही
आपण लाचेची तक्रार केली तर संबंधित शासकीय कार्यालयातील आपले काम होणार नाही. ते तटवले जाईल, अशी भीती नागरिकांना असते. मात्र, तक्रारदाराचे कोणतेही काम तटणार नाही, याची दक्षता लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभाग घेईल, असेही नाळे यांनी सांगितले.