
गड-काळभैरव यात्रा बैठक
80374
काळभैरी डोंगर : यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्थळपाहणीप्रसंगी बाबासाहेब वाघमोडे यांनी सूचना दिल्या. याप्रसंगी राजीव नवले, दिनेश पारगे, शरद मगर, रोहित दिवसे उपस्थित होते.
--------------------------------
भाविकांच्या सुरक्षेत तडजोड नाही
प्रांताधिकारी वाघमोडे : काळभैरव यात्रेच्या तयारीबाबत आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर प्रथमच विनानिर्बंध काळभैरवाची यात्रा होत आहे. त्यामुळे भाविकांची अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. प्रशासन व स्थानिकांनी समन्वयाने काम करूया. वर्षातून एकदाच येणाऱ्या बाहेरच्या भाविकांना प्राधान्य देऊया. भाविकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने त्यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी स्पष्ट केले.
येथील ग्रामदैवत काळभैरवाची यात्रा मंगळवारी (ता. ७) होत आहे. या पार्श्वभूमीवर काळभैरी डोंगरावर आढावा बैठक झाली. याप्रसंगी श्री. वाघमोडे बोलत होते. पोलिस उपअधीक्षक राजीव नवले, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, सहायक पोलिस निरीक्षक रोहित दिवसे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी डोंगरावर यात्रेच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामाची पाहणी केली.
बैठकीत विभागनिहाय आढावा घेण्यात आला. तीन वैद्यकीय पथके तयार केली असून मंदिराजवळ, डोंगराच्या वरील बाजूस व कमानीजवळ प्रत्येक एक पथक असेल असे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीता कोरे यांनी सांगितले. पाणी तपासणी करण्याची सूचना श्री. मगर यांनी केली. एसटीचे आगार व्यवस्थापक सुनील चव्हाण यांनी कोल्हापूरला जाणाऱ्या गाड्यांसाठी शेंद्री मार्ग अडचणीचा असल्याने वडरगे मार्गेच वाहतूक सुरु ठेवली जाणार असल्याचे सांगितले. उपकार्यकारी अभियंता सागर दांगट यांनी वीज वितरणचा आढावा घेतला. शॉर्ट सर्किटची समस्या उद्भवणार नाही याची काळजी घेण्याची सूचना करण्यात आली.
मानकऱ्यांना दुचाकीसाठी पास देण्याची मागणी विश्वास खोत व सुधीर पाटील यांनी केली. अत्यावश्यक सेवेच्या संपर्क क्रमांकाचे डिजीटल फलक पाच-सहा ठिकाणी उभारण्यास श्री. मगर यांनी सूचविले. पालखीच्या पुढे गोंडे नसावेत याची पोलिस दलाने तर बेकायदेशीरपणे स्टॉल उभा राहणार नाहीत याची ग्रामपंचायतीने खबरदारी घ्यावी, असे श्री. वाघमोडे यांनी सांगितले. याशिवाय विविध विभागांचा आढावा घेण्यात आला.
...
* कायद्याचे पालन करा...
पोलिस उपअधीक्षक राजीव नवले म्हणाले, ‘एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. बेकायदेशीर गोष्टींना थारा देऊ नका. कायद्याचे पालन करा. भावना नंतरची गोष्ट आहे. आधी भाविकांची सुरक्षा महत्त्वाची आहे.''