
फुटबॉल
लोगो - शाहू छत्रपती केएसए लीग
80456
कोल्हापूर : शाहू छत्रपती केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ (अ) विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यातील एक क्षण. (बी. डी. चेचर : सकाळ वृत्तसेवा)
खंडोबा तालीम-बालगोपाल सामना बरोबरीत
संध्यामठ तरुण मंडळाचा झुंजार क्लबवर १-० ने विजय
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : शाहू छत्रपती केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ (अ) विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. दोन्ही संघांच्या बचावफळीने आक्रमक चढाया रोखल्याने पूर्ण वेळेत एकही गोल होऊ शकला नाही. तत्पूर्वीच्या सामन्यात मात्र संध्यामठ तरुण मंडळाने झुंजार क्लबवर १-० ने विजय मिळवला. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे.
बालगोपाल विरुद्ध खंडोबा यांच्यातील सामन्यात खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला. खंडोबाच्या खेळाडूंनी शॉर्ट पासवर चढायांचे केलेले प्रयत्न फोल ठरले असले तरी त्यांची धडपड वाखाणण्याजोगी होती. बालगोपालच्या बचावफळीने तितकाच उत्कृष्ट प्रतिकार केला. त्यांच्या अभिनव साळोखेने खंडोबाच्या मोठ्या डी बाहेरून मारलेला फटका खंडोबाच्या गोलजाळीजवळून गेला. त्यांचा व्हिक्टर चेंडू घेऊन गोलजाळीच्या दिशेने चाल करत होता. तो खेळाडूंना चकविण्यात मात्र कमी पडत होता. खंडोबाकडून दिग्विजय आसनेकर, अबू बकर, कुणाल दळवी, संतोष मेढे यांना बालगोपालची बचावफळी भेदता आली नाही. उत्तरार्धात तरी गोल होईल, अशी अपेक्षा होती. दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी जीवतोड प्रयत्न केले. खंडोबाकडून सागर पोवार, अजिज मोमीन, तर बालगोपालकडून ऋतुराज पाटील, प्रतीक पोवार व कुणाल नाईक यांनी चांगल्या खेळाचे दर्शन घडवले.
तत्पूर्वीच्या सामन्यात संध्यामठकडून यश जांभळेने उत्तरार्धातील ४८ व्या मिनिटाला नोंदवलेला गोल निर्णायक ठरला. या गोलची परतफेड झुंजार क्लबला पूर्णवेळेत करता आली नाही. संध्यामठकडून स्वराज सरनाईक व इम्रान बांदार, तर झुंजारकडून सूर्यप्रकाश सासने, अवधूत पाटोळे, विशाल सासने, कार्लोस नाला, यश साळोखे यांनी चांगला खेळ केला.
--------
चौकट
सोमवारचे सामने
उद्या (ता. ५) सामन्याला सुट्टी असून, सोमवारपासून (ता. ६) पाचवी फेरी सुरू होत आहे. फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध झुंजार क्लब यांच्यात दुपारी दोन, तर शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात दुपारी चार वाजता सामन्यास सुरुवात होईल.