विद्यापीठाच्या ‘सिनेट’ची बुधवारी पहिली बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठाच्या ‘सिनेट’ची बुधवारी पहिली बैठक
विद्यापीठाच्या ‘सिनेट’ची बुधवारी पहिली बैठक

विद्यापीठाच्या ‘सिनेट’ची बुधवारी पहिली बैठक

sakal_logo
By

विद्यापीठ ‘सिनेट’ची उद्या पहिली बैठक

व्यवस्थापन परिषदेसाठी निवडणूक; अधिकार मंडळांवर सदस्यांचे नामनिर्देशन होणार

कोल्हापूर, ता. ६ ः शिवाजी विद्यापीठाच्या नव्या अधिसभेची (सिनेट) पहिली बैठक बुधवारी (ता.८) दुपारी १२ वाजता विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात होणार आहे. त्यामध्ये अधिसभा सदस्यांमधून व्यवस्थापन परिषदेवर सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी निवडणूक होईल. त्यासह इतर अधिकार मंडळांवर सदस्यांचे नामनिर्देशन केले जाणार आहे.
विद्यापीठाची अधिसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात झाली. त्यानंतर अधिसभा आणि अन्य अधिकार मंडळांवरील सदस्यांच्या नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये व्यवस्थापन परिषदेतील ८ जागांपैकी एक जागा रिक्त आहे. उर्वरित ७ पैकी ५ जागांवर सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यात संस्थाचालक गटातून पृथ्वीराज संजय पाटील यांची, तर प्राचार्य गटामधून डॉ. व्ही. एम. पाटील, आर. व्ही. शेजवळ आणि शिक्षक गटातून प्रा. बबन सातपुते, नोंदणीकृत पदवीधर गटामधून अमरसिंह रजपूत यांची बिनविरोध निवड झाली. आता शिक्षक प्रवर्गातील खुल्या गटातील एक आणि नोंदणीकृत पदवीधर गटामधील एक जागेसाठी निवडणूक होणार आहे. त्यातील शिक्षक गटासाठी तीन, तर नोंदणीकृत पदवीधरमधन दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासाठी बुधवारी अधिसभेच्या बैठकीत मतदान होणार आहे. या वेळी विद्यापीठाची स्थायी समिती, तक्रार निवारण समिती, शिष्यवृत्ती समितीची नियुक्ती केली जाणार आहे. शैक्षणिक संस्था तपासणीच्या समितीवर पाठविण्यात येणाऱ्या एका सदस्याची निवड केली जाणार आहे. दरम्यान, निवडणूक आणि नामनिर्देशनासाठी असल्याने अधिसभेच्या बैठकीत प्रश्‍नोत्तराचा तास होणार नाही.