
जिल्हाधिकारी पत्रकार परिषद
सीमाभागातील तरुणांसाठी १९ ला रोजगार मेळावा
जिल्हाधिकारी रेखावार : अर्जुननगर येथील देवचंद कॉलेजमध्ये आयोजन
कोल्हापूर, ता. ७ : सीमाभागातील तरुणांना सरकारीसह नामवंत कंपन्यांमध्ये नोकरी मिळावी, यासाठी रविवारी (ता. १९) छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनमित्त महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील युवकांसाठी रोजगार मेळावा घेण्यात येईल. अर्जुननगर (ता. कागल) देवचंद कॉलेजमध्ये सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दिली. तसेच, जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी ‘गोकुळ’चे संचालक चेतन नरके यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासन पंधरा दिवसांची निवासी कार्यशाळा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री. रेखावार म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासन व कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगार मेळावा घेतला जात आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये बीपीओ, केपीओ, एनजीओ, बँकिंग, हॉटेल, फायनान्स, रिटेल, शैक्षणिक, दवाखाने, बांधकाम व्यवसाय, आरोग्य, ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चअरिंग, विमा क्षेत्रातील अनेक खासगी संस्था कर्मचारी भरती करण्यासाठी उपस्थित असतील. त्याच ठिकाणी अर्जदारांची छाननी करून नेमणुकीचे पत्र दिले जाणार आहे.
दुग्ध व्यवसाय कार्यशाळेबाबत ते म्हणाले, ‘पंधरा दिवसांच्या कार्यशाळेत तांत्रिक माहिती दिल्यानंतर प्रात्यक्षिकही घेतले जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान जे शिक्षण दिले जाईल, ते प्रात्यक्षिकांमध्ये शिकवले जाणार आहे. प्रशिक्षण झाल्यानंतर त्या सर्वांना दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी विविध बँकांच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जाईल. यासाठी एनडीडीबीकडूनही मान्यता मिळाली आहे. राष्ट्रीयस्तरावरील ज्या-ज्या संस्था आहेत, त्यांचेही लक्ष याकडे आहे. याठिकाणी हा प्रयोग यशस्वी झाला तर तो राष्ट्रीय पातळीवरही राबवला जाणार आहे. पंधरा दिवसांचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी आणि पशु वैद्यकीय अधिकारी जिल्हा पातळीवर काम करतील. यासाठी ‘गोकुळ’चे संचालक चेतन नरके यांनी पुढाकार घेतला आहे. यावेळी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ जिल्हा प्रमुख रवींद्र माने, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, मनीषा माने उपस्थित होते.
...
तक्रारी सोडविण्याचे प्रमाण चांगले
मुख्यमंत्री सचिवालय कक्षामध्ये येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण आणि त्यांची सोडवणूक करण्याचे प्रमाण चांगले आहे. आतापर्यंत १७३ अर्ज आले आहेत. यापैकी ३० अर्ज मंत्रालयीन स्तरावरील आहेत. तर उर्वरित जिल्हा पातळीवरील आहेत. दरम्यान, जिल्हा पातळीवरील प्रश्न महिन्यात सुटले नाही तर ते प्रश्न मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडे पाठवावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले आहे.
...