विद्यापीठाच्या मॅनेजमेंट, निवड समितींवर विकास आघाडीचे वर्चस्व

विद्यापीठाच्या मॅनेजमेंट, निवड समितींवर विकास आघाडीचे वर्चस्व

Published on

फोटो (KOP23L81421)
...................................

विकास आघाडीच्या हाती विद्यापीठाची ‘मॅनेजमेंट’

डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली यश; रघुनाथ ढमकले, स्वागत परुळेकर विजयी; निवड समितींवरही बाजी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ८ ःशिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) पाठोपाठ आता व्यवस्थापन परिषद (मॅनेजमेंट कौन्सिल) मध्ये डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील विद्यापीठ विकास आघाडीने वर्चस्व मिळविले. व्यवस्थापन परिषदेतील दोन जागांसाठी आज झालेल्या निवडणुकीत प्रा. रघुनाथ ढमकले आणि ॲड. स्वागत परुळेकर यांनी विजय मिळवत आघाडीचे संख्याबळ वाढविले. स्थायी, तक्रार निवारण, महाविद्यालय तपासणी, गुणवत्ता शिष्यवृत्ती निवड समितीवरील नामनिर्देशनामध्ये आघाडीने बाजी मारली.
या निवडणूक आणि नामनिर्देशनासाठी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात सिनेटची पहिली बैठक झाली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी काम पाहिले.
व्यवस्थापन परिषदेतील शिक्षक प्रवर्गातील खुल्या गटातील एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. ढमकले यांनी ४० मतांसह विजय मिळविला. विरोधातील ‘सुटा’चे उमेदवार डॉ. निवासराव वरेकर यांना १४ मते मिळाली. नोंदणीकृत पदवीधर प्रवर्गामध्ये खुल्या गटातील एका जागेसाठी आतेबहीण-भाऊ यांच्या लढत झाली. त्यात ॲड. परुळेकर यांनी ४२ मते घेत बाजी मारली. विरोधातील शिव-शाहू आघाडीच्या श्‍वेता परूळेकर यांना ११ मते मिळाली. अधिसभा सदस्यांची संख्या एकूण ६९ असून, त्यापैकी ५४ जणांनी व्यवस्थापन परिषदेतील दोन जागांसाठी मतदान केले. नोंदणीकृत पदवीधर गटात एक मत अवैध ठरले. या निवडणुकीनंतर विविध समितींवरील नामनिर्देशनाची प्रक्रिया झाली. त्यात अधिसभा सदस्य डॉ. मंजिरी मोरे यांची विद्या परिषदेवर, प्राचार्य सर्जेराव पाटील, प्रा. प्रशांत खरात, डॉ. अजित पाटील यांची स्थायी समितीवर आणि डॉ. दत्तात्रय मोरे यांची महाविद्यालये तपासणी समितीवर बिनविरोध निवड झाली. डॉ. शंकर हंगिरगेकर, डॉ. अर्चना कोलेकर यांची विद्यापीठ तक्रार निवारण समिती, तर गुणवत्ता शिष्यवृत्ती समितीवर अभिषेक मिठारी यांची निवड झाली. हे सर्वजण विकास आघाडीचे सदस्य आहेत.
या निवडीनंतर कुलगुरू डॉ. शिर्के यांनी उपस्थित अधिसभा सदस्यांना त्यांचे अधिकार आणि कर्तव्ये, सभागृहाचे कामकाज, विद्यापीठ कायदा, आदींबाबत मार्गदर्शन केले. दरम्यान, विकास आघाडीच्या विजयी उमेदवार आणि पदाधिकारी, सदस्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
...

प्राचार्य, संस्थाचालक गट बिनविरोध

व्यवस्थापन परिषदेतील प्राचार्य गटात विकास आघाडीचे डॉ. व्ही. एम. पाटील, आर. व्ही. शेजवळ यांची आणि व्यवस्थापन प्रतिनिधी गटात पृथ्वीराज संजय पाटील यांची, तर नोंदणीकृत पदवीधर गटात अमरसिंग रजपूत आणि शिक्षक गटात ‘सुटा’चे डॉ. बबन सातपुते यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, या परिषदेवर न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. पाटील आणि डॉ. ढमकले यांना एकाचवेळी काम करण्याची संधी मिळाली आहे.
.....

‘विद्यापीठ विकास आघाडीने अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिनेट निवडणुकीत देदीप्यमान यश मिळवित एकतर्फी वर्चस्व कायम राखले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ विकासासह उच्च शिक्षणातील गुणवत्तावाढीसाठी आम्ही योगदान देणार आहोत.
-डॉ. व्ही. एम. पाटील, सचिव, विद्यापीठ विकास आघाडी
...

‘सुटा’चा आक्षेप, कुलगुरूंचे स्पष्टीकरण

तक्रार निवारण समितीवरील नामनिर्देशनावेळी विकास आघाडीने डॉ. हंगीरगेकर, तर ‘सुटा’ने डॉ. प्रकाश कुंभार यांचे नाव सुचविले. त्यानंतर हात उंचावून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. त्यावर डॉ. कुंभार, मनोज गुजर, श्‍वेता परुळेकर यांनी कागदपत्रे सादर करण्यासह माघारीसाठी मुदत दिली नसल्याच्या मुद्दावरून आक्षेप घेतला. विकास आघाडीचे डॉ. ढमकले यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवावी, अशी मागणी केली. त्यावरून काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्रभारी कुलसचिव डॉ. शिंदे यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर डॉ. कुंभार यांनी उमेदवारी मागे घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.