यंत्रमागधारकांचे १५० कोटी वाचणार

यंत्रमागधारकांचे १५० कोटी वाचणार

Published on

यंत्रमागधारकांचे १५० कोटी वाचणार
वीज बिलातील पोकळ थकबाकीप्रश्नी दिलासा; खासदार माने यांचा पाठपुरावा

इचलकरंजी, ता. ८ ः राज्यातील २७ एचपीवरील यंत्रमागधारकांच्या वीज बिलातील दोन महिन्यांची पोकळ थकबाकी निकाली निघाली आहे. फेब्रुवारी व मार्चच्या वीज बिलातून प्रत्येकी ५० टक्के पोकळ थकबाकी कमी होणार आहे. याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून राज्यातील संबंधित यंत्रमागधारकांच्या वीज बिलातून तब्बल १५० कोटींचा बोजा कमी होणार आहे. याबाबतची माहिती यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन दिली.
राज्यातील २७ एचपीवरील यंत्रमागधारकांना ऑनलाइन नोंदणी करण्याची सक्ती केली होती. नोंदणी न केलेल्या यंत्रमागधारकांची वीज सवलत रद्द केली होती. त्यामुळे डिसेंबर २०२१ व जानेवारी २०२२ या दोन महिन्याची वीजबिले भरमसाठ वाढून आली होती. याबाबत यंत्रमागधारकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर पुढील काळात पुन्हा अनुदान पूर्ववत करण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला होता. मात्र ज्या दोन महिन्यात यंत्रमागधारकांना वीज बिलात अनुदान दिलेले नव्हते ती पोकळ थकबाकी अजून यंत्रमागधारकांच्या बिलात येत आहे. महावितरणकडून या बिलाच्या वसुलीचे भूत संबंधित यंत्रमागधारकांच्या मानगुटीवर होते. खासदार धैर्यशील माने यांनी या प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन चर्चा केली. या वेळी महाजन यांनी हा प्रश्न प्रभावीपणे मांडला होता. आता त्याचा निर्णय महावितरण कंपनीच्या पातळीवर झाला आहे. जानेवारीच्या वापराचे बिल म्हणजे फेब्रुवारीत येणाऱ्या बिलात त्या पोकळ थकबाकीची रक्कम ५० टक्के व मार्च महिन्यात येणाऱ्या वीजबिलात राहिलेली ५० टक्के रक्कम वजा करण्यात येणार आहे.
--
इचलकरंजी परिसरातून ५० कोटी कमी होणार
इचलकरंजी शहर व परिसरातील २७ एचपीवरील २५०० वीज जोडणी असलेले यंत्रमागधारक आहेत. त्यांची सुमारे ५० कोटींची पोकळ थकबाकी या निर्णयाने कमी होणार आहे. राज्यातील यंत्रमागधारकांचे दीडशे कोटी कमी होणार आहेत. या निर्णयामुळे संबंधित यंत्रमागधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.