अमुल, हॅटसनची घुसखोरी

अमुल, हॅटसनची घुसखोरी

अमूल, हॅटसनचे दूध संघांसमोर आव्हान

जोरदार तयारी ः ‘अमूल’ च्या संकलन केंद्राचे रूईत भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अमूल व हॅटसन या परराज्यातील दूध संघांनी दूध संकलनाची जोरदार तयारी सुरू केली आहे. कोल्हापूर जिल्हा दूध संघासह (गोकुळ) जिल्ह्यातील इतर दूध संघांच्या तुलनेत जादा दर, पशुखाद्यांसाठी सचिवांना जादा कमिशन आणि त्या जोडीला दिली जाणारी पशुवैद्यकीय सेवा यामुळे हे दूध संघ ‘गोकुळ’ सह इतर संघांसमोर मोठे आव्हान उभे करू शकतात.
दरम्यान, अमूल दूध संघाने संकलन केंद्रासाठी रूई (ता. हातकणंगले) येथे जागा घेऊन त्यावर प्रकल्पाचे भूमिपूजनही केले आहे. करवीरनंतर सर्वांत चांगले, सकस दूध शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत मिळत असल्याने या दोन बाहेरच्या संघांनी याच दोन तालुक्यांत आपले लक्ष केंद्रित केले आहे. या तालुक्यातील प्रतिसाद पाहून अन्य तालुक्यात प्रकल्पाचा विस्तार करण्याचे नियोजन आहे.
सध्या ‘गोकुळ’ गायीच्या ८ फॅट दुधाला प्रती लिटर ३५ रुपये दर देते. अमूलने हाच दर प्रती लिटर ३७ रुपये केला आहे, तर ११ तारखेपासून या दरात प्रती लिटर दोन रुपये वाढ करून तो ३९ रुपये केला आहे. त्याचप्रमाणे हॅटसनही दर देणार आहे. ‘गोकुळ’ म्हशीच्या दुधाला प्रती लिटर ४७ रुपये दर देते. हॅटसनने हा दर ११ फेब्रुवारीपासून ५२ रुपये देणार, असे जाहीर केले आहे. तसे फलकही शिरोळ तालुक्यात लावण्यात आले आहेत. या दोन संघांबरोबरच बारामतीचा ‘सुमुल’ हा संघही जिल्ह्यात दूध संकलनाची चाचपणी करत आहे.
या जोडीला शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत या दोन संघांनी पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती अलीकडेच केली आहे. दोन्ही संघांचे पशुखाद्यही बाजारात आले असून ते खपवण्यासाठी प्राथमिक दूध संस्थांतील सचिवांना धरण्यात आले आहे. या सचिवांना ‘गोकुळ’ प्रती पोत्यामागे दहा रुपये कमिशन देते. या संघांनी मात्र हेच कमिशन ५० रुपये केले आहे. त्याचा मोठा फटका ‘गोकुळ’ च्या पशुखाद्य विक्रीवर शक्य आहे.
...............

दोन टाक्या बांधणार

‘अमूल’ ने हातकणंगले तालुक्यात संकलन प्रकल्पासाठी जागा घेतली. यापुढे जाऊन रूई व कबनूर येथे प्रत्येकी दहा हजार क्षमतेचे दोन बल्क कुलर मिल्कच्या टाक्या बांधण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. यासाठी आवश्‍यक जागेची खरेदीही झाली आहे.
................

स्पर्धक संघ संपले

‘गोकुळ’ च्या इर्षेवर यापूर्वी जिल्ह्यात अनेक संघांची उभारणी झाली. त्यात महालक्ष्मी, मयूर, शाहू, स्वाभिमानी, समृद्धी असे अनेक छोटे-मोठे संघ आले; पण ‘वारणा’ वगळता यातील बहुतांशी संघांचा ‘गोकुळ’ समोर टिकाव लागला नाही. यातील काही संघ बंद झाले, तर काही संघ चालवण्यास दिले; पण अमूल व हॅटसन यांची आर्थिक स्थिती भक्कम आहे. मार्केटिंगचे नवे तंत्र त्यांच्याकडे आहे आणि बाजारपेठ काबीज करण्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असल्याने ‘गोकुळ’ समोर हे मोठे आव्हान असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com