नियम बदलाची भीती सोडा, तणावमुक्त राहून परीक्षा द्या

नियम बदलाची भीती सोडा, तणावमुक्त राहून परीक्षा द्या

नियमांची भीती सोडा, तणावमुक्त राहून परीक्षा द्या
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना आवाहन; वेळेत केंद्रावर पोहोचण्याची दक्षता घ्या
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी वेळ, प्रश्‍नपत्रिका याबाबतच्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना दिलेल्या सवलती यावर्षी बंद केल्या आहेत. परीक्षेबाबत जुने नियम लागू केले आहेत. त्याने परीक्षा, मूल्यमापन पद्धतीमध्ये फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या नियम बदलाची भीती सोडा आणि तणावमुक्त राहून परीक्षा द्यावी, असे आवाहन कोल्हापुरातील शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांनी केले. या नियम बदलांबाबत विद्यार्थ्यांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र होते. त्यावर मुख्याध्यापक, शिक्षकांची मते आज जाणून घेण्यात आली.
शिक्षण मंडळाने लागू केलेल्या नियमानुसार विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात १०ः३० वाजता, तर दुपारच्या सत्रात २ः३० वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचणे बंधनकारक आहे. तरच त्यांना परीक्षा कक्षात प्रवेश मिळून पेपर देता येणार आहे. शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित प्रश्‍नपत्रिका असणार आहे. शाळा तेथे केंद्र असणार नाही. पेपर सोडविण्यासाठी ३० मिनिटांचा वाढीव वेळ असणार नाही. या पद्धतीने कोरोनापूर्वी परीक्षा घेतल्या जात होत्या. त्यामुळे नियमांत फार बदल नाहीत.
-------------
कोट
गैरमार्गाला आळा घालण्यासाठी एसएससी बोर्डाने शाळा तेथे केंद्र पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे केंद्र निश्‍चिती केली आहे. त्या केंद्रावर जाऊन नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांनी ताणमुक्त राहून परीक्षा द्यावी.
- विवेक ठाकूर, मुख्याध्यापक
---------
नवीन अभ्यासक्रमावर आधारित कृतिपत्रिका आराखड्यासाठी ८० गुणांची प्रश्‍नपत्रिका सोडविण्यासाठी तीन तास आणि ४० गुणांसाठी दोन तासवेळ पूर्वीप्रमाणे योग्य आहे. वाढीव वेळेमुळे मूल्यमापन योग्य होणार नाही.
- एच. आर. लोंढे, शिक्षक
--------------
यंदा परीक्षेबाबत नवीन नियम लागू झाल्याचे समजल्यानंतर भीती वाटली. मात्र, शिक्षक आणि कुटुंबीयांनी त्याबाबतची स्पष्ट माहिती दिल्याने ती दूर झाली आहे.
- गायत्री चव्हाण, परीक्षार्थी

उत्तरपत्रिका केंद्रांवर पोहोचल्या...
कोल्हापूर विभागातील दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवर उत्तरपत्रिका, तर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत प्रात्यक्षिक परीक्षांचे साहित्य पोहोचविले आहे. केंद्रसंचालकांच्या बैठका सुरू आहेत. नियंत्रण कक्ष कार्यन्वित झाला आहे. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून परीक्षा द्यावी, असे आवाहन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळाचे प्रभारी विभागीय सचिव डी. एस. पोवार यांनी केले.

जिल्ह्यातील आकडेवारी
बारावीची परीक्षा केंद्र - ६८
कनिष्ठ महाविद्यालये - ३७६
परीक्षार्थी - ५०६४६
दहावीची परीक्षा केंद्रे - १३६
शाळा - ९७६
परीक्षार्थी - ५३६७५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com