आरोग्य शिबिर

आरोग्य शिबिर

81610

आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणार
जिल्हाधिकारी रेखावार ः जागरूक पालक, सुदृढ बालक अभियानास प्रारंभ

कोल्हापूर, ता. ९ ः कोरोनासारख्या आजारांना व आरोग्यविषयक नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यात येणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये रोगनिदान आरोग्य शिबिर, महारक्तदान शिबिर, जागरूक पालक, सुदृढ बालक अभियान व हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ स्थापन करणे आदी कार्यक्रमांचे उद्‍घाटन रेखावार यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ. सुप्रिया देशमुख, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते. लाईन बाजार येथील सेवा रुग्णालयात हा कार्यक्रम झाला.
मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण म्हणाले, ‘शून्य ते नऊ वर्षे वयोगटात मुलांच्या बुद्धीची साधारण ८५ टक्के वाढ होते. पूर्वीच्या काळी मोठ्या कुटुंब व्यवस्थेमुळे आजी, आजोबांसह कुटुंबातील अन्य सदस्य वेगवेगळ्या बाबींबाबत बालकांसोबत गप्पा मारत असत. त्यामुळे संवादातून मुलांच्या बुद्धीचा विकास होत होता; परंतु सध्या छोट्या कुटुंब व्यवस्थेत पालक व बालकांमधील संवाद मोबाईलमुळे हरवत चालला आहे. तो वाढवला पाहिजे.’ स्वागत डॉ. कदम यांनी केले. आभार डॉ. वेदक यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com