राजे, गडहिंग्लजकरांना माफ करा ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजे, गडहिंग्लजकरांना माफ करा !
राजे, गडहिंग्लजकरांना माफ करा !

राजे, गडहिंग्लजकरांना माफ करा !

sakal_logo
By

राजे, गडहिंग्लजकरांना माफ करा !
दोन शिवजयंतीबद्दल भावना; लोकोत्सवाच्या भव्यतेसाठी संयुक्त नियोजनाची गरज
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : पुढील आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. ही जयंती लोकोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी गडहिंग्लजमध्ये नियोजनाच्या वेगवेगळ्या दोन बैठका झाल्या. म्हणजेच दोन शिवजयंती होण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘राजे, गडहिंग्लजकरांना माफ करा !’ अशा शब्दात शिवप्रेमींसह नागरिक भावना व्यक्त करीत आहेत. एकच भव्य शिवजयंतीसाठी संयुक्त नियोजनाची गरजही व्यक्त होत आहे.
छत्रपती शिवरायांबद्दलचा आदर, प्रेम सर्व जातीधर्मातील आबालवृद्ध सर्वांनाच आहे. दरवर्षी १९ फेब्रुवारीची त्यांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी होते. गडहिंग्लजही त्याला अपवाद नाही. दोन वर्षे कोरोनानंतर निर्बंधमुक्त वातावरणात साजरी होणारी ही पहिलीच शिवजयंती आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्येही दांडगा उत्साह आहे. राजे...समाजातील सर्वच घटकांचे आहेत. यामुळे त्यांची जयंती साजरी करण्याची इच्छा प्रत्येकांत असतेच. बहुतांश ठिकाणी एकाच दिवशी एकापेक्षा अनेक मिरवणुकांसह विविध उपक्रमही राबवले जातात. किती संख्येने त्यांची जयंती साजरी करायची, याला बंधन नसले तरी सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याचे छत्रपती शिवरायांचे धोरण या उत्सवातून पहायला मिळावे इतकीच अपेक्षा जनतेची असते.
या वर्षी गडहिंग्लजला दोन शिवजयंती होणार, याची झलक मिळत आहे. असे याच वर्षी होत आहे असेही नाही. दोन्ही बाजूने राजकीय मंडळींचा पुढाकार असला तरी या जयंतीला राजकीय वलय न देण्याची खबरदारी घेऊन ही जयंती सर्वधर्मसमभाव, सर्वपक्षीय व लोकोत्सव म्हणून साजरी करण्याचा प्रयत्न चांगलाच आहे. हे सारे बरोबर असले तरी एकच भव्य शिवजयंती साजरी करून विधायक व सामाजिक उपक्रमाद्वारे गडहिंग्लजचा आदर्श निर्माण करण्यात काय हरकत आहे, अशी अपेक्षा शिवप्रेमींची आहे. मिरवणुकीत चित्ररथ सादर करणाऱ्‍या विविध संस्था, संघटना व मंडळांचींही कोंडी झाली आहे. कोणत्या मिरवणुकीत आपण सहभागी व्हायचे, हा यक्ष प्रश्‍न त्यांना पडला आहे. संयुक्त जयंतीच्या उत्सवातून शिवरायांच्या कर्तृत्वाला आणखीन भव्यता प्राप्त करून देण्याचा आदर्श गडहिंग्लजकरांनी तयार करावा, अशी अपेक्षा जनतेची आहे.
----------
* वेळ गेलेली नाही...
शिवजयंती उत्सवाला आठवडाभराचा कालावधी आहे. दोन्ही बाजूचे नियोजन तयार आहे. त्या दोन्ही नियोजनाला संयुक्त स्वरुप आणणे शक्य आहे. एकाच शिवजयंतीतून ईर्ष्या, श्रेय आणि खर्चालाही फाटा मिळेल. यामुळे दोन्ही बाजूचा ‘इगो’ दूर करून संयुक्त शिवजयंतीसाठी प्रयत्न व्हावेत. अजूनही वेळ गेलेली नाही. गडहिंग्लजकर शिवप्रेमी म्हणून काहीच अशक्य नाही.