केडीसी बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केडीसी बातमी
केडीसी बातमी

केडीसी बातमी

sakal_logo
By

जिल्हा बँकेवरील आरोप
खोटे, दिशाभूल करणारे
डॉ. माने ः संताजी घोरपडे कारखाना शेअर्स, बँकेचा संबंध नाही

कोल्हापूर, ता. ९ ः जिल्हा बँकेबाबतचे झालेले आरोप निखालस खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी आज पत्रकाद्वारे दिली आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे शेअर्स आणि बँकेचा काडीमात्र संबंध नाही, असेही त्यात म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे, की शासनाकडून ३९ हजार ५३ शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेतून प्रत्येकी दहा हजार रुपयांप्रमाणे ठेवतारण कर्जामार्फत शेअर्स खरेदी केल्याचे आरोप आहेत. त्यात एका शेतकऱ्याने ५० हजार रुपये, एकाने २० हजार रुपये तर एकाने ११ हजार रुपये, या पद्धतीने २५ लोकांनी पाच हजारापासून ५० हजारापर्यंत ठेवी ठेवल्या आहेत. उर्वरित ३९ हजार २८८ शेतकऱ्यांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांप्रमाणे बँकेकडे मुदतबंद ठेवी ठेवल्याचीही चुकीची माहिती देण्यात आली आहे. त्यातून सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला ४० कोटींचे कर्ज दिल्याचाही आरोप केला आहे. तो खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.
बँकेकडे ता. २४ व २५ जानेवारी २०२३ या दोन दिवसांत ९ हजार ५८७ शेतकऱ्यांची ३५ कोटी, एक लाख २९ हजार, ११२ रुपये जमा झाले. त्यानंतर एक फेब्रुवारी रोजी २० हजार ५७४ शेतकऱ्यांचे ७३ कोटी, ५५ लाख, ९९ हजार, ९०० रुपये जमा झाले. जिल्ह्यातील बारा तालुक्यांमधील एकूण ३० हजार १६१ शेतकऱ्यांचे पैसे सरकारकडून जमा झालेले आहेत. पैकी काही शेतकऱ्यांनी स्व इच्छेने बँकेकडे ठेवी ठेवलेल्या आहेत, हे बँक नाकारत नाही. मात्र ३९ हजार लोकांनी मुदतबंद ठेवीवर तारण कर्ज घेऊन सरसेनापती कारखान्याला शेअर्स खरेदीसाठी पैसे दिलेले आहेत, हे धादांत खोटेच आहे आणि जनतेची दिशाभूल करणारेच आहे.

बँकेचा पाया भक्कम
१९३८ ची स्थापना असलेली बँक गेली ८५ वर्षे सेवारत आहे. जिल्हाभरातील तीन लाख एक हजार २७७ शेतकरी सभासद बँकेशी जोडले गेले आहेत. दरवर्षी बँक त्यांना पीक कर्ज व मुदती कर्ज पुरवठा करते. तसेच ११ हजार ७०६ सहकारी संस्था सभासद असून त्यांना बँक कर्ज पुरवठा करते. बँकेकडे सहा लाखापर्यंत ठेवीदार आहेत. अशा पद्धतीने या बँकेचा पाया भक्कम आहे. त्यामुळे सभासदांकडून कागदपत्रे न घेता बँक व्यवहार करते, हे म्हणणे चुकीचे आहे, असेही डॉ. माने यांनी म्हटले आहे.