
शेट्टी प्रतिक्रिया
‘केसीआर’ यांच्या ऑफरवर
शेट्टींकडून सावध पवित्रा
प्रस्थापित पक्षांना वगळून आघाडी झाल्यास सोबत जाण्याचा विचार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः देशात शेतकऱ्यांचे सरकार यावे यासाठी देश पिंजून काढण्याचे रणशिंग नांदेडमध्ये येऊन फुंकणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना महाराष्ट्राच्या प्रमुखपदी राजू शेट्टी हवे आहेत. कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रात पक्ष विस्तार करीत पंतप्रधानपदाची मनीषा बाळगणारे ‘केसीआर’ यांनी ‘भारत राष्ट्र समिती’ या पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद राजू शेट्टी यांनी स्वीकारावे असा प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर शेट्टी यांनी सावध पवित्र घेताना या वृत्ताला दुजोरा देतानाच नेतृत्व करू, पण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे सांगितले.
दरम्यान, प्रस्थापित चार पक्षांना वगळून राव हे स्वतंत्र आघाडी करत असतील तर त्यामध्ये जाण्यास तयार असल्याचे शेट्टी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
‘अबकी बार, शेतकरी सरकार’ अशी घोषणा देत राज्याराज्यांत राव जाणार आहेत. तेलगू भाषकांची लोकसंख्या लक्षात घेता पाच फेब्रुवारीला नांदेडमध्ये सभा घेऊन त्यांनी महाराष्ट्राच्या आखणीचे चित्र तयार केले आहे.
महाराष्ट्रातील काही शेतकरी नेत्यांना केसीआर यांनी राज्याचे काम बघण्याची गळ घातली आहे. शेट्टी पक्षाचे प्रमुख होण्यास तयार झाले तर लोकांत मान्यता असलेला चेहरा मिळेल, असे केसीआर यांना वाटते. त्यांनी नांदेड जिल्ह्यात प्रचार प्रारंभ केला.
चौकट
नेतृत्त्व करू पण...ः शेट्टी
याबाबत स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक माजी खासदार शेट्टी म्हणाले, ‘‘तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांनी महाराष्ट्रातील नेतृत्व करण्याची विनंती मला केली आहे, त्यासाठी त्यांनी आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रणही दिले आहे. मी नेतृत्व करण्यास तयार आहे, पण कोणत्याही पक्षात जाणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न हे माझ्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यासाठी निवडणूक लढवावी लागते म्हणून मी स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. मला राजकारणात करिअर करायचे नाही, त्यापेक्षी चळवळ महत्त्वाची आहे. ३० वर्षे मी याच चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. पण, आज देशात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढणारा एकही पक्ष नाही, त्यामुळे मी कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार केलेला नाही. तथापि, राव प्रस्थापित चार पक्षांना वगळून देशाच्या पातळीवर प्रबळ विरोधी पक्ष तयार करणार असतील तर त्यांना माझा पाठिंबा राहील. मीच राजकीय पक्षात जाऊन अडकून पडलो तर ही चळवळ पुढे कोण नेणार?’’