आजरा बनणार ‘एग्झॉटीक फळ’ पिकांचा हब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा बनणार ‘एग्झॉटीक फळ’ पिकांचा हब
आजरा बनणार ‘एग्झॉटीक फळ’ पिकांचा हब

आजरा बनणार ‘एग्झॉटीक फळ’ पिकांचा हब

sakal_logo
By

ajr92.jpg
81642
दाभिल (ता. आजरा) ः येथे लागवड केलेली विविध प्रकारच्या फळपिकांची झाडे.
------------------------------
आजरा बनणार ‘एग्झॉटीक फळ’ पिकांचा हब
दाभिलमध्ये लागवड ः बारा प्रकारची फळ झाडे, पर्यायी पिकाचा प्रयोग
रणजित कालेकर ः सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १० ः तालुक्यात परदेशी फळ झाडांची लागवड केली जात आहे. यासाठी दाभिलचा परिसर निवडला आहे. येथे सुमारे चाळीस एकरात बारा प्रकारच्या परदेशातील फळांची शेती केली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास आजरा तालुका ‘एग्झॉटीक फळ’ पिकांचा हब बनणार आहे.
मूळचे गोवा येथील शेतकरी रियाज देसाई यांनी या परिसरात जमीन घेऊन परदेशी फळांची लागवड सुरू केली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी येथे मुळचे मॅक्सिको आणि मध्य अमेरिकेतील झाड असलेल्या अॅव्होकाडोची पाच एकरावर लागवड केली. अॅव्होकाडोमधील पिटरहास, हास व रिड या तीन जाती लावल्या आहेत. या झाडांची वाढ चांगली असल्याचे दिसून आले आहे. यंदा त्यांनी अॅब्यू, रोलीना, सन्ड्रॉप, माटोओ, सिद्धा, सोअरसोप, प्लंब (यामधील मरियन प्लंब), मॅन्गो स्टिन, मलबेरी, नरमेटा, डुरेन ही परदेशी फळ पिकांची लागवड केली आहे. ही फळपिकांची शेती चांगलीच फुलत आहेत. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला तर शेतकऱ्यांना नवा फळपिकाचा पर्याय मिळणार आहे.
परदेशी फळपिकांमध्ये अनेक पौष्‍टिक गुणधर्म असतात. त्यामुळे आरोग्यदायी जीवनशैलीत या फळाचा आवर्जून समावेश केला जात आहे. त्यामुळे याला गोवा, पुणे, मुंबई यासारख्या शहरामध्ये बाजारपेठ उपलब्ध आहे. ग्राहकांकडून मागणी असून मोठी किंमतही मिळत आहे. शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. या प्रयोगाच्या यशानंतर तालुक्यात परदेशी फळपिकांची लागवड होण्यास वाव आहे. भविष्यात आजरा तालुका ‘एग्झॉटीक हब’ म्हणून ओळखला जाईल.
------------
आजऱ्याची होणार नवी ओळख
ऐंशी वर्षांपूर्वी आजरा तालुका हा इचलकरंजी संस्थानाचा भाग होता. तो आजरा महाल म्हणून ओळखला जाई. संस्थानिक श्रीमंत नारायणराव घोरपडे यांनी येथे विविध विदेशी फळ झाडांच्या लागवडीचे प्रयोग केले होते. बहुतांश यशस्वी ठरले. यापैकी काही फळ झाडे घाटकरवाडी व आजरा परिसरात पहावयास मिळतात. त्यांनी येथील हवामानाचा विचार करून लागवड केली होती. याची आठवण ताजी करणारे दाभिल येथील प्रयोग असून यातून आजऱ्याची नवी ओळख तयार होण्यास मदत होणार असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
-------------
आजरा तालुक्यातील भौगोलिक घटक (माती, पाणी, हवामान) सद्यस्थितीला परदेशी फळपिकांसाठी उपयुक्त ठरत आहेत. येथे लागवड केलेल्या परदेशी झाडांची वाढ चांगली झाली आहे. फळधारणा, फळाची गुणवत्ता व उत्पादन यानंतर या प्रयोगाबाबत स्पष्टता येणार आहे. कृषी विभागाकडून या फळझांडाच्या वाढ व अन्य गोष्टी निरक्षण नोंदवून माहिती घेतली जात आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शेतकऱ्यांना नवा पर्याय मिळेल.
- के. एन. मोमीन, तालुका कृषी अधिकारी, आजरा