
विशाळगडवर महाशिवरात्री
विशाळगडावर शुक्रवारपासून महाशिवरात्री उत्सव
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : विशाळगडावरील भगवंतेश्वर मंदिरात शुक्रवारी (ता. १७) आणि शनिवारी (ता. १८) महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती संभाजी ऊर्फ बंडा साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साळुंखे म्हणाले, ‘‘निपाणी येथील श्री विरुपाक्षलिंग समाधी मठातील प्राणलिंग महास्वामी यांच्या हस्ते ब्राह्म मुहूर्तावर श्री भगवंतेश्वराला अभिषेक करण्यात येईल. वेगवेगळ्या नद्यांचे जल अभिषेक कुंभ आणि शिवनेरी गडावरुरून आणलेले जल कुंभ भगवंतेश्वरावर अर्पण करण्यात येणार आहे. सकल हिंदू समाज, हिंदुत्ववादी संघटना, सेवाव्रत प्रतिष्ठान कोल्हापूर प्रेरित राजे छत्रपती शिवाजी महाराज दुर्ग संरक्षण संवर्धन व सेवा समितीतर्फे आयोजन केले आहे. शुक्रवारी सायंकाळी सात वाजता विशाळगडावर प्रस्थान होईल. शनिवारी पहाटे पाच वाजता भगवंतेश्वरला अभिषेक आणि पूजा होईल. सकाळी सात वाजता गड फेरी होईल. अमृतेश्वर मंदिर, बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू यांच्या समाधीचे दर्शन करण्यात येईल. यानंतर नरवीर दौड होईल. सकाळी ११ वाजता भगवा चौक येथे भगवा ध्वज फडकविला जाईल. तसेच नरवीर दौडमधील विजेत्यांचा गौरव केला जाईल. मुंढा दरवाजा येथेही भगवा ध्वज फडकविण्यात येईल. दुपारी १२ वाजता भगवंतेश्वर मंदिर येथे खिचडी प्रसाद वाटप होईल. दुपारी एक वाजता ध्येयमंत्र आणि प्रेरणा मंत्राचे सादरीकरण केले जाईल.
दरम्यान, पंचायतीमध्ये गडावर महाशिवरात्रीच्या दिवशी तसेच एक दिवस आधी आणि एक दिवसानंतर कोणत्याही प्राण्याची कत्तल होणार नाही, याचा ठराव करण्यात आल्याची माहिती साळुंखे यांनी दिली. महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून शिव-शंभू भक्तांनी विशाळगडावर यावे, असे आवाहन केले आहे.
पत्रकार परिषदेला दिलीप भिवटे, निळकंठ माने, विनायक आवळे, विजय गुळवे, महेश जाधव, तुकाराम मांडवकर आदी उपस्थित होते.