
वैशाख वणवा पेटला; थंडी गायब
82571
पहाटे थंडी, दुपारी असह्य उन,
सायंकाळी सहानंतर पुन्हा थंडी
कोल्हापूर, ता. १३ : पहाटे आणि सायंकाळी सहानंतर थंडी, दुपारी मात्र असह्य उन, अशी स्थिती शहर परिसरात झाली आहे. त्यामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच दुपारचा उन्हाचा चटका सुरू झाला.
३५ अंश तापमान हे सर्वसाधारणपणे एप्रिल-मे मध्ये असते; मात्र गेले चार दिवस दुपारी ३३ ते ३५ अंशांपर्यंत तापमान गेले. नंतर हेच तापमान सायंकाळी सहानंतर १६/१७ अंशांपर्यंत खाली येते. तापमानवाढीच्या या खेळामुळे सर्दी, खोकला, शिंका, कणकण, डोकेदुखी, अंगदुखीने लोक त्रस्त झाले आहेत. थेट ३५ अंशांवरून १७ अंशांपर्यंत जेव्हा तापमान येते, या प्रक्रियेला ‘डाययुरिनल टेम्परेचर व्हेरिएशन’ ही संज्ञा वापरली जाते, अशी माहिती मयूर सुतार यांनी दिली. लहान मुले, बालके, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींना या तापमानवाढीतील फरकाचा परिणाम होतो. ती आजारी पडतात.
सुतार म्हणाले, ‘फेब्रुवारीपासून दुपारी तीव्र उन जाणवत असले, तरी यावर्षीचा एप्रिल-मेमधील उन्हाळा तीव्र असेल का, हे आज तरी सांगता येणार नाही. कारण दररोज वातावरण बदलत असते. यासाठी आम्ही पुढील दोन आठवड्यांचा तापमानाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी देतो.’
कोट
सर्वसाधारणपणे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात रात्री कमी तापमान जाणवते; मात्र दुपारी उन्हाची तीव्रता जास्त जाणवते. अशावेळी हे तापमान शरीर पटकन स्वीकारत नाही. मग उष्णतेचा त्रास सुरू होतो. विविध आजार बळावतात. काही झाले तरी हवामान बदलांचा हा परिणाम जागतिक पातळीवर जसा सुरू आहे, त्याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यालाही तो जाणवत आहे.
-मयूर सुतार, ग्रामीण कृषी मोसम सेवा, शेंडा पार्क.