
आगीत अडीच लाखांचे नुकसान
82601
...
गॅस गळतीने ताराबाई पार्कात शेडला आग
अडीच लाखांचे नुकसान ः गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने अनर्थ टळला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः गॅस गळतीमुळे आज सकाळी ताराबाई पार्क परिसरात घराशेजारील मजुराच्या शेडला आग लागून सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले. येथे असलेल्या चार गॅस सिलिंडरचा स्फोट झाला नसल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे अग्निशमन विभागातून सांगण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे तास-दीड तासांनी ही आग आटोक्यात आणली.
ताराबाई पार्क येथे आज सकाळी साडेसातच्या सुमारास गॅसचा वास येत असल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. त्यांनी तातडीने ताराराणी चौकीतील बंब तेथे रवाना केला. दरम्यानच्या काळात तेथे एका घराशेजारील मजुराच्या शेडला आग लागली. गॅस गळतीमुळे आग लागल्यामुळे जवानांनी सावधगिरी बाळगून तेथील चार गॅस सिलिंडर बाहेर काढली. धूर वाढत होता, वासही पसरत होता. त्यामुळे कसबा बावडा येथील आणखी एक बंब घटनास्थळी दाखल झाला.
दरम्यानच्या काळात घरातील प्रापंचिक साहित्य, कपाटे, धान्य, वातानुकूलीत यंत्रणा (ए.सी.), मोबाइल हॅण्डसेट, भांडी अशा इतर साहित्याचे नुकसान झाले. अग्निशमन दलाचे प्रमुख तानाजी कवाळे, स्थानक प्रमुख मनीष रणभिसे आणि जयवंत खोत यांच्या मार्गदर्शनासह उमेश जगताप, उमाजी निकम, वामन चौरे, केरबा निकम, तानाजी वडर, वैभव सनदे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
--------------------