
कोल्हापूर गोकाक कनेक्शन आज उघड होणार
गोकाकमधील खून प्रकरणाचे
कोल्हापूर कनेक्शन उघड होणार
कोल्हापूर, ता. १३ ः कोल्हापुरात गावठी पिस्तूलची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांपैकी एकाचा थेट गोकाकमधील खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे धागेदोरे कोल्हापुरातील पोलिसांना मिळाले आहेत. उद्याच त्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता असल्याचेही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, गावठी पिस्तूलची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. आणखी एक संशयित बेपत्ता असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. तो, गोकाकचा असल्यामुळे त्याच्यावरही संशयाची सुई फिरण्याची शक्यता आहे. तो किंवा त्याच्याशी संबंधित कोणी गोकाकमध्ये गावठी पिस्तुलाचा वापर केला आहे काय, याचा तपास अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे गोकाकमधील खून कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे.
एक व्यक्ती बेपत्ता असलेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित कोल्हापुरातील आहे काय याचा शोध सुरू केला होता. त्या दरम्यान आंबेवाडी रोडवर गावठी पिस्तूल विक्री करणाऱ्या तिघांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असतानाच त्यापैकी आणखी एक संशयित गोकाकचा असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे त्याचा शोध पोलिस घेत आहेत. अटक केलेल्यांकडून पिस्तूल जप्त केली आहे. त्यांचा वापर गोकाकमध्ये झाल्याची माहिती पुढे आली. त्याचा आणि गोकाकमधील कोणत्या खुनाचा काही संबंध आहे काय याचा तपास पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस करीत आहेत.
गोकाकमधील पोलिसांना तेथील बेपत्ता व्यक्तीच्या तपासासाठी मदत केली आहे. तेथील एकाच्या खुनाचा मुख्य संशयित आरोपीजवळ आम्ही पोहोचलो आहे. लवकरच त्याला अटक केली जाईल. याबाबतची माहिती उद्या जाहीर करण्याची शक्यता आहे. जवळच्या मित्रानेच एकाचा खून केल्याचे संदर्भ असल्याचेही निरीक्षक वाघमोडे यांनी स्पष्ट केले.