
कॉंग्रेस आमदार निवेदन
82740
....
नियोजन समितीमधून
निधीचे समान वाटप व्हावे
काँग्रेस आमदारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः जिल्हा नियोजन समितीमधून देण्यात येणाऱ्या निधीचे लोकप्रतिनिधींना समान वाटप करावे, अशी मागणी काँग्रेसच्या चार आमदारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली. शेजारच्या जिल्ह्यात निधीचे वाटप झाले असून, कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप याबाबत कोणतीही हालचाल झाली नसल्याचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
शिष्टमंडळात आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, आमदार राजूबाबा आवळे यांचा समावेश होता. समान निधी वाटपाबाबतची बाब पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निदर्शनास आणून द्यावी, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना दरवर्षी निधी देण्यात येतो. हा निधी वाटप करत असताना सर्व लोकप्रतिनिधींना समान पद्धतीने निधी वाटप होणे अपेक्षित असते, पण यावेळी वेगळे सूत्र अवलंबले जाणार असल्याचे समजते. जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे सहा, तर राष्ट्रवादीचे दोन असे विरोधी पक्षाचे एकूण आठ आमदार आहेत. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाचे दोन आमदार आहेत. जर वरील सूत्रानुसार निधी वाटप केले तर केवळ विरोधी गटाला निधी मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, निधी वाटपाबाबत असे कोणतेही सूत्र अद्याप ठरलेले नसून पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यापर्यंत मागणी पोहचवू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी रेखावर यांनी शिष्टमंडळाला दिली.