
व्हॅलेंटाईन डे साजरा
82760
‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर बांधली विवाहगाठ
सामाजिक उपक्रमांचाही झालर ः अवघा सोशलमीडिया गुलाबी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः ‘व्हॅलेंटाईन डे’ला आयुष्यभर साथ सोबत करण्याचे वचन देत आज अनेक जोडप्यांनी विवाह बंधन साकारले. आयुष्यभर प्रेमाचा दिवस अविस्मरणीय राहील, या उद्देशाने अनेकांनी १४ फेब्रुवारीचा मुहूर्त साधला. दरम्यान, विविध सामाजिक उपक्रमांसह ‘व्हॅलेंटाईन पार्टी’च्या प्रेमोत्सवात आज शहरात व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. आठवडाभर सुरू असलेल्या प्रेमोत्सवाची त्यानिमित्ताने सांगता झाली. विविध हॉटेल, रेस्टॉरंटनी जाहीर केलेल्या खास व्हॅलेंटाईन ऑफरला मोठा प्रतिसाद मिळाला. दिवसभर गुलाबासह गिफ्ट आर्टिकल खरेदीसाठी गर्दी राहिली. सायंकाळनंतर व्हॅलेंटाईन पार्टी, कँडल लाईट डिनरवर अनेकांनी भर दिला.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हॅलेंटाईनडेची धूम राहिली. काल मध्यरात्रीपासूनच स्टेटस्वर जोडीदाराचा फोटो ठेवत व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या. एकूणच सोशल मीडिया गुलाबी झाला. तसेच युवा ऑर्गनायझेशनतर्फे राजारामपुरीतील महापालिका उद्यानात दिवसभर रक्तदान व थॅलेसिमिया झालेल्या लहान मुलांसाठी विशेष शिबिर झाले. देहदान व नेत्रदान संकल्प मोहीमही राबविली. रक्तदान शिबिराला तरुणाईने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. ५४१ जणांनी रक्तदान केले. विविध सामाजिक संस्थांतर्फे विविध उपक्रम राबविले. वृक्षारोपण करून व्हॅलेंटाईन डे साजरा केला. यूथ मुव्हमेंटसतर्फे रविवारी (ता. १९) व्हॅलेंटाईन डेनिमित्त एक घास भुकेलेल्यांसाठी (रोटी डे) हा उपक्रम होणार आहे.
कोट
दरवर्षीच १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’चा मुहूर्त साधत विवाह करण्याकडे तरुणाचा कल असतो. यंदा आज मुहूर्तही होता, त्यामुळे शहरातील बरीच मंगल कार्यालये विवाहासाठी बुक होती.
- सागर चव्हाण, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा सामाजिक सेवा, सांस्कृतिक मंगल कार्यालय संघ.