
अमल महाडिक बैठक
लोगो- महापालिका
-
फोटो- 82825
-
शहरातील चार उड्डाणपुलांचे आराखडे बनवा
अमल महाडिक; पाच मार्चपर्यंत सादर करण्यासाठी संयुक्त पाहणी
कोल्हापूर, ता. १४ ः शिरोली जकात नाका ते कावळा नाका, दाभोळकर कॉर्नर ते दसरा चौक व दसरा चौक ते शिवाजी पूल यासह शिये पूल ते कसबा बावडा अशा चार उड्डाणपुलांचे प्रकल्प आराखडे पाच मार्चपर्यंत तयार करा. यासाठी २२ फेब्रुवारीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी. त्याचवेळी रूंदी मोजून भूसंपादनाची गरज असल्यास आराखड्यात नमूद करावी, अशा सूचना माजी आमदार अमल महाडिक यांनी केली.
महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आज त्यांनी संयुक्त बैठक घेतली. राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित रस्त्यावरील पुलांबरोबरच कावळा नाका ते टेंबलाई उड्डाणपुलापर्यंतही नवीन पूल प्रस्तावित करण्याच्या सूचना केल्या. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील उड्डाणपुलांचे आराखडे तातडीने सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार महाडिक यांनी या बैठकीत स्थिती जाणून घेतली. महापालिकेच्या पॅनेलवरील आर्किटेक्ट संदीप गुरव यांनी प्राथमिक आराखड्याचे सादरीकरण केले. शहरातील पूर्वीच्या राष्ट्रीय महामार्गांची माहिती महापालिकेने दिली.
त्यानंतर महाडिक म्हणाले, ‘‘एकात्मिक रस्ते प्रकल्पांतर्गंत रुंदीकरण केले असल्याने तावडे हॉटेल ते शिवाजी पुलापर्यंत तीन पूल करता येतील. शिये पूल ते कसबा बावडा हा रस्ता पुरावेळी बंद होऊ नये म्हणून तीनशे मीटर लांबीचा पूल करावा. त्यासाठी तीनही विभागांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी. त्यावेळी रूंदी कमी असल्यास कोठे भूसंपादन करावे लागेल, याची माहिती द्यावी. पाच मार्चला सादर करण्यात येणाऱ्या आराखड्यात त्याचा समावेश करावा. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात विद्यापीठजवळील जुना रिंगरोड तसेच नवीन प्रस्तावित केलेल्या रिंगरोडसाठीचे तसेच अंतर्गत रस्त्यांवर चार ठिकाणी उड्डाणपूल करण्याच्यादृष्टीने आराखडे तयार करावेत. फुलेवाडी ते उजळाईवाडी हा रस्ताही राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत विस्तारीत केला जावा. त्याकरिता महामार्गाच्या अटी काय आहेत, त्यांची पूर्तता कशापद्धतीने करता येईल, याची माहिती प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी द्यावी. शहरातील व परिसरातील ग्रामीण भागातील पुराचा फटका कमी करण्यासाठी शिरोली व उचगाव येथील महामार्गाच्या भरीव पुलाऐवजी बॉक्स करण्याचे काम तातडीने करावे.’’ यावेळी कचरा प्रकल्पातून महापालिका प्लास्टिक स्वतंत्र करते. ते प्लास्टिक प्राधिकरणने वापरावे. त्याचा वाहतुकीचा खर्च त्यांनी द्यावा, असेही महाडिक यांनी सुचवले.
माजी नगरसेवक सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी यांनीही सूचना केल्या. उपायुक्त रविकांत आडसूळ, प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर, सी. बी. भराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग विभागाचे मुधाळे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, कार्यकारी अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता नारायण भोसले, एन. एस. पाटील, सतीश फप्पे, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, डॉ. विजय पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
उड्डाणपलू होणाऱ्या रस्त्याची नेमका स्थिती सांगा?
महाडिक यांनी तावडे हॉटेल ते शिवाजी पुलापर्यंतचा शहरातील रस्ता महामार्ग होता. पण, मध्यंतरी महापालिकेने केलेल्या ठरावानंतर त्या रस्त्याची स्थिती नेमकी काय आहे, याची विचारणा शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना विचारली. बैठक सुरू असताना सरनोबत यांनी तो रस्ता सोडून इतर रस्त्यांची माहिती दिली. पण, सत्यजित कदम यांनी त्या रस्त्याची माहिती तातडीने महामार्ग प्राधिकरणला द्या, असे सांगितले.