
प्राथमिक शिक्षक संघाची शुक्रवारी रत्नागिरी येथे शिक्षण परिषद
प्राथमिक शिक्षक संघाची
शुक्रवारी रत्नागिरीत शिक्षण परिषद
कोल्हापूर, ता. १४ः नव्या शैक्षणिक धोरण आणि विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे (थोरात गट) रत्नागिरी येथील चंपक मैदानात शिक्षण परिषद आणि शिक्षक मेळावा होणार आहे. त्यामध्ये राज्यभरातून सुमारे दोन लाख शिक्षक सहभागी होतील, अशी माहिती या संघाचे राज्य संपर्कप्रमुख एस. व्ही. पाटील आणि जिल्हाध्यक्ष रवी पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
एस. व्ही. पाटील म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी १० वाजता या शिक्षण परिषदेचे उद्घाटन होईल.’ परिषदेचे स्वागताध्यक्ष उद्योगमंत्री उदय सामंत, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, बंदरे व खणीकर्ममंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराजे देसाई हे प्रमुख उपस्थित असणार आहेत. परिषदेत जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही प्रमुख मागणी असणार आहे. शिक्षक नेते संभाजीराव थोरात, संघाचे राज्य अध्यक्ष अंबादास वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेची तयारी सुरू आहे.