
गोकाकमधील व्यापाऱ्याच्या खून प्रकरणी तरुणाला अटक
फोटो - ८२७६१
कोल्हापूर ः स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यातील दोघे बेकायदा शस्त्रविक्री प्रकरणी, तर एकाला खून प्रकरणी अटक झाली आहे. या तिघांवर कारवाई करणारे पोलिस पथक.
गोकाकमधील व्यापाऱ्याच्या
खून प्रकरणी तरुणाला अटक
---
डॉक्टरच्या सांगण्यावरून कृत्याचाही जबाब
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः गोकाकमधील प्रसिद्ध व्यापारी राजेश सत्यनारायण झंवर (वय ५३) यांच्या खून प्रकरणी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आज एका तरुणाला अटक केली. शफात इर्शादअहमद तरासगर (२४, रा. लकड गल्ली, मोहल्ला, गोकाक) असे त्याचे नाव आहे. डॉ. सचिन शिरगावी (रा. गोकाक) याच्या सांगण्यावरून आपण दोन साथीदारांसह झंवर यांचा खून केल्याची कबुली शफातने तपासात दिल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः बेकायदेशीर हत्यारांची विक्री करणाऱ्या टोळीचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक करीत होते. या वेळी रोहितराज लक्ष्मण भोसले (२५, रा. अंतरंग हॉस्पिटलजवळ, नागाळा पार्क) हत्यार विक्रीसाठी वडणगे येथे शनिवारी (ता. ११) येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने वडणगे ते आंबेवाडी रस्त्यावर सापळा रचत रोहितराज आणि त्याचा साथीदार अरबाज सिकंदर मुल्ला (२५, रा. जाधव भवनजवळ, आंबेवाडी) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि अन्य साहित्य असा ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दोघांकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी आणखी एक पिस्तूल शफातमार्फत गोकाक येथील डॉ. सचिन शिरगावीला विकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांचे एक पथक गोकाकला गेले. मात्र, डॉ. शिरगावी मिळून आला नाही. त्यानंतर पोलिसांनी शफात याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, मोबाईल हँडसेट जप्त केला. शफातकडे डॉ. शिरगावीबाबत चौकशी करण्यात आली. त्या वेळी शफातने आपण त्यांच्या सांगण्यानुसार दोन साथीदारंना घेऊन शुक्रवारी (ता. १०) रात्री झंवर यांचा खून केल्याची कबुली दिली. झंवर यांच्या पोटात आणि पाठीत चाकूने वार करून त्यांना ठार केले आणि त्यांचा मृतदेह गोकाकमधील कोळवी कालव्यात फेकून दिल्याचे सांगितले.
पोलिसांनी सांगितले, की आर्थिक व्यवहारातून डॉ. शिरगावी आणि झंवर यांचा वाद असल्याचेही सांगितले. याबाबतची खातरजमा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या अधिकाऱ्यांनी गोकाक पोलिसांकडे केली असता झंवर बेपत्ता असल्याची तक्रार नोंद असल्याचे स्पष्ट झाले. शफातचा ताबा घेण्यासाठी गोकाक पोलिसांचे एक पथक येणार असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.
अशी झाली ओळख
पोलिसांनी सांगितले, की शफात एसी दुरुस्त करतो. डॉ. शिरगावीकडील एसी खराब झाला. त्याच्या दुरुस्तीसाठी शफात डॉ. शिरगावीकडे दुरुस्तीसाठी गेला होता. त्यातून दोघांची ओळख झाली. या ओळखीतूनच डॉक्टरने शफातला झंवर यांना मारण्याची सुपारी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.